टेक्सटाईल झोन जागेअभावी वांद्यात
By Admin | Updated: September 11, 2016 00:57 IST2016-09-11T00:57:10+5:302016-09-11T00:57:10+5:30
मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला यवतमाळातील बहुप्रतिक्षीत टेक्सटाईल झोन पुरेशा जागेअभावी वांद्यात सापडला आहे.

टेक्सटाईल झोन जागेअभावी वांद्यात
राजकीय अनास्था : मुंबईत घेणार आढावा
यवतमाळ : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला यवतमाळातील बहुप्रतिक्षीत टेक्सटाईल झोन पुरेशा जागेअभावी वांद्यात सापडला आहे. आता या झोनच्या अस्तित्वाबाबतचा आढावा १५ सप्टेंबरनंतर एमआयडीसीकडून मुंबईत घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी एकाच वेळी चार टेक्सटाईल झोन घोषित केले होते. त्यात यवतमाळचाही समावेश होता. सर्वाधिक कापूस पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख असल्याने येथे प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावे, त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, पर्यायाने शेतकरी आत्महत्या थांबविण्यास मदत व्हावी या उदात्त हेतूने हा झोन घोषित करण्यात आला होता. या टेक्सटाईल झोनसाठी यवतमाळच्या विस्तारीत औद्योगिक वसाहतीमधील ६९ हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर यवतमाळ व अमरावती एमआयडीसीच्या कार्यालयांमध्ये काहीशा हालचाली झाल्यात, फाईली फिरल्या परंतु त्यानंतर सर्व काही थंडबस्त्यात पडले. गेली काही महिने टेक्सटाईल झोनच्या मुद्यावर एमआयडीसीमध्ये शुकशुकाट पहायला मिळतो आहे. विशेष असे या टेक्सटाईल झोनबाबत राज्य शासनातील कुणीही मंत्री, आमदार किंवा माजी आमदार, राजकीय नेते कुणीही ब्रसुद्धा काढलेला नाही. यावरून टेक्सटाईल झोनला स्थापनेपूर्वीच राजकीय अनास्थेचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. ते पाहून आता एमआयडीसीने जागा कमी पडत असल्याचा मुद्दा पुढे केला आहे.
यवतमाळच्या टेक्सटाईल झोनसाठी किमान अडीचशे हेक्टर जागेची आवश्यकता आहे. ६९ हेक्टर जागेतील टेक्सटाईल झोन सोईचा होणार नाही. सीएमओच्या आग्रहामुळे झालाच तर येथे मोठे उद्योग येण्याची शक्यता राहणार नाही.
टेक्सटाईल झोन आल्यास त्याच्या जलनि:सारणाचा प्रकल्प उभारावा लागणार आहे. अर्थात दूषित पाणी पुन्हा शुद्ध करून वापरायोग्य बनवावे लागणार आहे. या प्रकल्पासाठी किमान ३०० कोटींचे बजेट असून सहा ते सात हेक्टर जागा लागणार असल्याचे एमआयडीसीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे टेक्सटाईल झोनची जागा आणखीनच कमी होईल. ज्या भागात ६९ हेक्टर जागा टेक्सटाईल झोनसाठी आरक्षित करण्यात आली. तेथे या जागेचा आणखी विस्तार करण्याची आणि ही जागा अडीचशे हेक्टरपर्यंत वाढविण्याची कोणतीही सोय नाही. कारण दोन बाजूंनी मुख्य मार्ग आले असून एका साईडला आधीच मोठा उद्योग थाटला गेलेला आहे. त्यामुळे टेक्सटाईल झोनच्या विस्ताराची अडचण निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून या झोनचा मुंबईत आढावा घेतला जाणार आहे. त्यात या झोनच्या भवितव्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. राजकीय गोटातील शांतता पाहता त्यांनाही हा झोन नको की काय अशी शंका निर्माण होत आहे. आमदारांच्या एका समितीतील सदस्यांनी हा झोन यवतमाळ ऐवजी लगतच्या तालुक्यांमध्ये शिप्ट करण्याची सूचना केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)