तहसीलवर नागरिकांची धडक
By Admin | Updated: June 7, 2017 00:53 IST2017-06-07T00:53:55+5:302017-06-07T00:53:55+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षही आक्रमक झाले आहे.

तहसीलवर नागरिकांची धडक
कुलूप लावण्याचा प्रयत्न : शिवसेना-काँग्रेससह विविध संघटनांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षही आक्रमक झाले आहे. याचा प्रत्यय उमरखेड शहरात आला. येथील तहसील कार्यालयावर मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास माजी आमदार विजय खडसे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्याचवेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. २९ जणांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्या घेवून काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांच्या नेतृत्वात उमरखेड तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ठाणेदार हनुमंत गायकवाड यांना या आंदोलनाची पूर्व कल्पना असल्याने त्यांनी आधीच तहसील कार्यालयासभोवताल पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला होता. त्यामुळे आंदोलक तहसीलजवळ पोहोचताच त्यांना बंदोबस्तावरील पोलिसांनी ताब्यात घेतले.
यामध्ये माजी आमदार खडसे यांच्यासह नंदकिशोर अग्रवाल, रमेश चव्हाण, बालय्या दुर्गमवार, शिवसेनेचे माजी सभापती कृष्णा पाटील देवसरकर, तालुका प्रमुख अॅड. बळीराम मुटकुळे, नगरपालिका उपाध्यक्ष अरविंद भोयर, सरपंच संघटनेच्या अध्यक्ष सविता कदम, बाळासाहेब चौधरी, प्रभाकर कदम, संजय पलय, अमरसिंग जाधव, धन्नू राठोड, कविता पोपुलवार, आशाताई देवसरकर, रेखा भरणे, शिवाजी माने, संदीप ठाकरे, गुणवंत सूर्यवंशी, रामराव वाठोरे, अमोल पतंगीराव, राम कदम, अतुल मैड, रेखा गवळे, अॅड.जितेंद्र पवार व पुंडलिक कदम आदींचा यामध्ये समावेश आहे.