ऐन श्रावणात शिवालये ओस; भाविकांना खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 02:27 PM2020-07-28T14:27:17+5:302020-07-28T14:27:48+5:30

यंदा ऐन श्रावणमासातही या मंदिरांचा एकांतवास संपलेला नाही. भाविकांना भोलेनाथाच्या दर्शनाची कितीही ओढ लागली तरी लॉकडाऊनच्या कठोर नियमांमुळे त्यांना मंदिरांपर्यंत जाता येणे मुश्कील आहे.

Temples of Lord Shiva are empty due to corona ; Grief to the devotees | ऐन श्रावणात शिवालये ओस; भाविकांना खंत

ऐन श्रावणात शिवालये ओस; भाविकांना खंत

Next
ठळक मुद्देश्रावण सोमवारच्या उत्सवात कोरोनामुळे खोडा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जंगलांनी व्याप्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात प्राचीन शिवालयांची संख्या खूप मोठी आहे. या दुर्गम ठिकाणच्या मंदिरांमध्ये श्रावणात अक्षरश: भाविकांची जत्रा असते. मात्र यंदा ऐन श्रावणमासातही या मंदिरांचा एकांतवास संपलेला नाही. भाविकांना भोलेनाथाच्या दर्शनाची कितीही ओढ लागली तरी लॉकडाऊनच्या कठोर नियमांमुळे त्यांना मंदिरांपर्यंत जाता येणे मुश्कील आहे. त्यामुळेच श्रावण सोमवारी जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

यवतमाळ जिल्ह्यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या जंगलांमध्ये अनेक हेमाडपंथी मंदिरांचा खजिना आहे. त्यात शिवमंदिरांची संख्या फार मोठी आहे. साधारणत: मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी, यवतमाळ तालुक्यातील रुईवाई, येळाबारा, दारव्हा तालुक्यातील तपोनेश्वर, महागाव, नेर, आणि बाभूळगाव तालुक्यातील रावसावंगी येथील हेमाडपंथी मंदिरांची भारतीय पुरातत्व खात्याकडे ह्यसंरक्षितह्ण म्हणून नोंद आहे. याशिवाय, यवतमाळ शहरातील केदारेश्वर आणि लोहारातील कमलेश्वराचे हेमाडपंथी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच यवतमाळलगतच्या चौसाळा टेकडीवरील चौसाळेश्वराचे मंदिर तर दरवर्षीच्या श्रावणात भक्तांनी गजबजून जाते.

मात्र यंदा मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून भाविकांना सध्या मंदिरात प्रवेश नाही. याच बंदीच्या काळात चातुमार्साचा काळ सुरू झाला आहे. श्रावण महिना सुरू झाला, तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे शिवालयांचा एकांतवास अजूनही कायम आहे.

येळाबारा येथील प्राचीन शिवमंदिरालगत सायखेडा धरण आहे. हा परिसर श्रावणात हिरवाकंच असतो. त्यामुळे देवदर्शनासोबतच निसर्ग पर्यटनाच्या उद्देशानेही येथे गर्दी होत असते. तपोनेश्वर, पांढरदेवी येथील मंदिरे घनदाट जंगलात वसलेली आहेत. महागाव, नेर, रावसावंगी, रुईवाईच्या मंदिरांची भाविकांना सदोदित ओढ असते. मात्र यंदा यापैकी कोणत्याही मंदिरात भाविकांची वर्दळ नाही. यवतमाळ शहरातील केदारेश्वर मंदिराने श्रावणानिमित्त रोषणाई केली, फुलांची आरास केली, लोहाराच्या कमलेश्वर मंदिरातही श्रावणाची मंगलमय तयारी आहे. चौसाळेश्वराचे मंदिर असलेली चौसाळा टेकडी भाविकांच्या आगमनाची वाट पाहात आहे.

Web Title: Temples of Lord Shiva are empty due to corona ; Grief to the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.