सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST2021-08-15T05:00:00+5:302021-08-15T05:00:07+5:30
९६ टक्के म्हणजे चार लाख २२ हजार ५९७ हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. जून-जुलै महिन्यातील पावसामुळे पिकांची स्थितीही चांगली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. ऑगस्ट महिन्यात ३ तारखेला जिल्ह्यात सरासरी ११.०१ मिमी झालेला पाऊस वगळता तब्बल १५ पैकी १४ दिवस कोरडे गेले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिकांची चिंता वाटू लागली आहे. पाऊस लांबल्यास नुकसानीची भीती आहे.

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र नऊ लाख १६ हजार ८१ हेक्टर एवढे असताना यंदा तब्बल आठ लाख ४३ हजार ६४ हेक्टर म्हणजेच सरासरीच्या ९२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र, मागील १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके करपू लागली असून, जिल्हाभरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यंदा जून महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. यंदा सरासरी क्षेत्राच्या ९२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या १०३ टक्के पेरा झाला आहे. सोयाबीनचे दोन लाख ७६ हजार ८३६ हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र असताना प्रत्यक्षात दोन लाख ८३ हजार ८७२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे, तर चार लाख ४० हजार ८९४ हेक्टर इतके कापसाचे सरासरी क्षेत्र असताना याच्या ९६ टक्के म्हणजे चार लाख २२ हजार ५९७ हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. जून-जुलै महिन्यातील पावसामुळे पिकांची स्थितीही चांगली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. ऑगस्ट महिन्यात ३ तारखेला जिल्ह्यात सरासरी ११.०१ मिमी झालेला पाऊस वगळता तब्बल १५ पैकी १४ दिवस कोरडे गेले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिकांची चिंता वाटू लागली आहे. पाऊस लांबल्यास नुकसानीची भीती आहे.
जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिनाही चांगला गेला. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पिकाबाबत चिंता वाढली आहे. पाऊस लांबल्यास नुकसान होईल.
- अंकुश रोहणकर, शेतकरी
सुरुवातीच्या समाधानकारक पावसामुळे यंदा मुबलक उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र, पावसामुळे चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊसच झालेला नाही. सध्या पाण्याची गरज आहे.
- अरुण निकम
जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, जुलैअखेरपासूनच पावसाने ओढ दिली आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र, पुढच्या दोन-तीन दिवसांत पाऊस होण्याचा अंदाज आहे. तरीही ज्यांच्याकडे सिंचन उपलब्धता आहे, त्यांनी पाणी द्यावे.
- राजेंद्र माळोदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी