तहसीलदार, डीएफओ अपहाराचे सूत्रधार
By Admin | Updated: June 30, 2014 00:07 IST2014-06-30T00:07:33+5:302014-06-30T00:07:33+5:30
झरी तालुक्यातील साडेअकरा कोटींच्या रोहयो घोटाळ्यात पाच अधिकारी गुंतले असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पाटण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार झरीचे

तहसीलदार, डीएफओ अपहाराचे सूत्रधार
तीन समित्यांचा अहवाल : झरीचा रोहयो घोटाळा साडेअकरा कोटींचा
सतीश येटरे - यवतमाळ
झरी तालुक्यातील साडेअकरा कोटींच्या रोहयो घोटाळ्यात पाच अधिकारी गुंतले असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पाटण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार झरीचे तत्कालीन तहसीलदार आणि पांढरकवडा उपवनसंरक्षक असल्याचे म्हटले आहे. नव्हे तर तसा ठपकाही तीन समित्यांनी या घोटाळ्याच्या चौकशी अहवालात ठेवला आहे.
झरीचे तत्कालीन तहसीलदार डी.एच. उदकांडे, पांढरकवडा उपवनसंरक्षक डी.बी. श्रीखंडे, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एच. मळघणे, रोहयो वनपरिक्षेत्र अधिकारी ए.ए. शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.जी. मेत्रे अशी घोटाळ्यात गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत डिसेंबर २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत झरी तालुक्यात कोट्यवधी रुपयांची कामे झाली. त्यापैकी ११ कोटी ५५ लाख ४८ हजारांचे वाटपही झाले. या कामांमधील गैरप्रकाराच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी चौकशी सुरू केली. त्यात सुरुवातीला वणीचे तत्कालीन उपविभागीय महसूल अधिकारी आणि रोहयोचे अमरावती विभागीय उपायुक्त यांनी स्वतंत्र चौकशी केली. तक्रारीच्या अनुषंगाने तथ्य आढळून आले. त्यांचा अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकारी मुद्गल यांनी पुन्हा बाभूळगावचे तत्कालीन तहसीलदार, दारव्हाचे तत्कालीन तहसीलदार व राळेगावचे तत्कालीन गटविकास अधिकारी अशा तीन समित्यांमार्फत चौकशी चालविली. या समित्यांनी जिल्हाधिकारी मुद्गल यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यामध्ये झरीच्या ११ कोटी ५५ लाखांच्या रोहयो घोटाळ्यात संबंधित पाचही अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले. मात्र या घोटाळ्याला तहसीलदार उदकांडे व उपवनसंरक्षक श्रीखंडे हे सूत्रधार असल्याचा ठपका ठेवला. तहसीलदार उदकांडे यांनी मजुरांची हजेरी पत्रके न पडताळता मजुरी प्रदानासाठी मान्यता दिली. सदर कामे कृती आराखड्यात समाविष्ट आहे किंवा नाही, याची शहानिशा न करताच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ग्रामसभेचा ठराव नसतानाही प्रशासकीय मान्यता दिली गेली. हजेरी पत्रके वाटताना ती गठ्ठा पद्धतीने दिल्या गेली, अशा अनेक अनागोंदी केल्याचे अहवालात म्हटले आहे. तर पांढरकवडाचे तत्कालीन उपवनसंरक्षक श्रीखंडे रोहयो कामांचे नियंत्रण अधिकारी होते. भ्रष्टाचार होताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्यांचाही यामध्ये मोठा सहभाग असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. शिवाय ही कामे मजुरांमार्फत न करता ती मशीनने केली. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांचे नियंत्रण आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. मजुरांऐवजी थेट कंत्राटदाराच्या माध्यमातून ही कामे झाल्याने या घोटाळ्याला तहसीलदार उदकांडे आणि उपवनसंरक्षक श्रीखंडे सर्वाधिक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. उदकांडे यांना अपहारातील ११ कोटी ५५ लाख ४८ हजारांसाठी जबाबदार धरले आहे. मात्र उपवनसंरक्षक श्रीखंडे अपहारात सामील असलेल्या रकमेचा उल्लेख अहवालात टाळण्यात आला.