२०० रुपयांसाठी शिक्षक संघाचे आंदोलन

By Admin | Updated: December 24, 2014 23:07 IST2014-12-24T23:07:22+5:302014-12-24T23:07:22+5:30

जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत अनेक मतमतांतरे आहेत. काहीकेल्या या शाळांतील गुणवत्ता सुधारण्यास तयार नाही. यासाठी जबाबदार असलेले शिक्षक आणि त्यांच्या संघटना

Teacher's movement for 200 rupees | २०० रुपयांसाठी शिक्षक संघाचे आंदोलन

२०० रुपयांसाठी शिक्षक संघाचे आंदोलन

यवतमाळ : जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत अनेक मतमतांतरे आहेत. काहीकेल्या या शाळांतील गुणवत्ता सुधारण्यास तयार नाही. यासाठी जबाबदार असलेले शिक्षक आणि त्यांच्या संघटना नसत्या उठाठेवी करण्यात व्यस्त असतात. सहाव्या वेतन आयोगानंतर गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांना जीवन शिक्षण मासिकाची २०० रुपये वार्षिक लोकवर्गणीही जड झाली आहे. काही काम नसलेल्या अशाच एका संघटनेने अनेक मागण्यांमध्ये या मुद्याचा समावेश करत ५ जानेवारीपासून धरणे आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ (रजि.नं. २३५) या संघटनेने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ५ जानेवारीपासून बेमूदत धरणे आंदोलन पुकारले आहे. १७ मागण्या त्यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. यामध्ये दहाव्या क्रमांकाची मागणीही अतिशय मजेशीर आणि चीड आणणारी आहे. आजची व्यवस्था खऱ्या अर्थाने नासली असेच यावरून दिसून येते. शिक्षकांच्या वैयक्तिक हितासाठी या संपूर्ण मागण्या आहेत. संघटना म्हणून त्यांची ती भूमिकाही बरोबर आहे.
मात्र केवळ २०० रुपयांची वार्षिक लोकवर्गणी तीही शिक्षकांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जीवन शिक्षण या मासिकासाठी देण्याची शिक्षकांची तयारी नाही. गावातील गुरुजींचे मास्तरमध्ये का रूपांतर झाले याचे उत्तरही याच कृतीतून दिसून येते. अध्यापनाविषयी आस्था नसलेल्या या शिक्षकांना वर्षातून २०० रुपये दर्जेदार मासिकासाठी देणेही चुकीचे वाटत आहे. आता या रकमेची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सहाव्या वेतन आयोगानंतर अनेक शिक्षकांकडे चारचाकी वाहन लागले आहे. मुख्यालयाची अ‍ॅलर्जी असलेले हे शिक्षक आपल्या आलीशान गाडीतूनच जिल्ह्याच्या ठिकाणावरून शाळेवर ये-जा करतात. यातील बहुतांश शिक्षक वेळेत कधीच शाळेत पोहोचत नाही आणि वेळेपूर्वीच शाळेबाहेर पडतात. अनेक शिक्षकांची सायंकाळ कोठे होते, त्यावर होणारा खर्च याचा जरी हिशोब काढला तर जीवन शिक्षण मासिकाचे वार्षिक २०० रुपये हे त्यांना परवडणारे नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे.
जिल्हा परिषद शाळा अस्तित्वात आल्या तेव्हापासूनच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे (एसईआरटी) यांनी जीवन शिक्षण हे शिक्षकांसाठी उपयुक्त असे मासिक काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तेव्हापासूनच हे मासिक प्रत्येक शिक्षकाला पुरविण्यात येते. त्यासाठी केवळ वार्षिक वर्गणी म्हणून २०० रुपये असे नाममात्र शुल्क आकारले जाते. या जीवन शिक्षण मासिकात दर्जेदार लेख आणि अध्यापन शैलीतील नवनवीन संकल्पना समाविष्ट केलेल्या असतात. मात्र केवळ पोट भरण्यासाठी संघटना चालविणाऱ्यांना ही बाब रूचलेली दिसत नाही. त्यांनी शिक्षकांच्या इतर मागण्यांसोबतच उत्साहाच्या भरात जीवन शिक्षण मासिकाचे २०० रुपयेही प्रशासनाला परत मागितले आहे.
सर्वात कमी काम आणि सर्वाधिक वेतन शिक्षकांना मिळते. त्याउपरही अशा पद्धतीने शासनाला वेठीस धरण्याचा प्रकार केला जात आहे. अर्थात या बाबींना अनेक शिक्षक संघटना व शिक्षक अपवादही आहेत. त्यांनी सातत्याने शैक्षणिक गुणवत्तेला केंद्रस्थानी मानून आंदोलने व उपक्रम राबविले आहे. मात्र नसती उठाठेव करणाऱ्या या शिक्षक संघटनेच्या इशाऱ्याने सर्वांनाच आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Teacher's movement for 200 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.