शिक्षकीपेशाला नव्या पिढीची ना!
By Admin | Updated: September 28, 2015 02:51 IST2015-09-28T02:51:20+5:302015-09-28T02:51:20+5:30
गेल्या काही वर्षात शिक्षकीपेशाचा सन्मान काहीसा घटला आहे. त्यामुळे नवी पिढी या पेशाच्या अभ्यासक्रमाकडे वळताना दिसत नाही.

शिक्षकीपेशाला नव्या पिढीची ना!
यवतमाळ : गेल्या काही वर्षात शिक्षकीपेशाचा सन्मान काहीसा घटला आहे. त्यामुळे नवी पिढी या पेशाच्या अभ्यासक्रमाकडे वळताना दिसत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील अध्यापक महाविद्यालयाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही वर्षांपूर्वी डीएड किंवा बीएड करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या. बारावी किंवा पदवीच्या परीक्षेला गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकत होता. निकालाची टक्केवारी किंचितही घसरली तरी डीएड, बीएडच्या प्रवेशापासून हजारो विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत होते. त्यातूनच पुढे व्यवस्थापन कोटा हा प्रकार अध्यापक महाविद्यालयांमध्ये निर्माण करण्यात आला. कमी टक्केवारी असणाऱ्या श्रीमंत विद्यार्थ्यांना या २० टक्के व्यवस्थापन कोट्यामधून प्रवेश दिला जात होता. त्यासाठी एक ते दीड लाखांपर्यंत शुल्कही विद्यार्थी स्वखुशीने भरत होते.
मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डीएड आणि बीएड महाविद्यालयांच्या अनेक जागा रिक्त राहात आहे. एकीकडे टीईटी, सीईटी सध्या परीक्षांना बेरोजगार उमेदवारांची खच्चून गर्दी होत आहे. मात्र नोकऱ्या त्यातील काही जणांनाच मिळू शकत आहे. त्यामुळे डीएड आणि बीएडधारक उमेदवारांची बेरोजगारी वाढत आहे. समाजातील असे हजारो बेरोजगार पाहून नवी पिढी हा अभ्यासक्रम टाळत आहे.
यंदा तर जागाच न भरल्याने जिल्ह्यातील बीएडची महाविद्यालये अद्यापही सुरू झालेली नाही. वास्तविक जुलैमध्येच सत्र सुरू होण्याची गरज आहे. यंदा मात्र आधी प्रवेश देऊन नंतर त्या जागांना मान्यता मिळविण्याची औपचारिकता पार पाडली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यात बीएडची साधारण १२-१३ महाविद्यालये आहेत. यावर्षी बीएड प्रवेशासाठी दोन प्रवेशफेऱ्या पार पडल्या. तरीही प्रत्येक महाविद्यालयात केवळ १४ ते १५ विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत होवू शकले. वास्तवात या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५० विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे या महाविद्यालयांनी आता प्रतीक्षा यादीची तिसरी फेरी आजमावून पाहण्याचे ठरविले आहे. यावेळी स्पॉट अॅडमिशनद्वारे थेट महाविद्यालयातच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठीही २९ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर अशा तीनच दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित ७५ टक्के रिक्त जागा या तीन दिवसात भरल्या जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. या जागा न भरल्यास अनेक बीएड महाविद्यालयांची मान्यता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)