शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात
By Admin | Updated: July 19, 2015 02:36 IST2015-07-19T02:36:48+5:302015-07-19T02:36:48+5:30
खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील माध्यमिक उच्चमाध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित ...

शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात
यवतमाळ : खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील माध्यमिक उच्चमाध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने व घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करूनही मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे २० जुलै रोजी हे आंदोलन माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यंच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे.
राज्याचे शिक्षण मंत्री हे राजकीय पक्षांशी संलग्नीत शिक्षक आमदारांसोबत चर्चा करतात. विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाशी चर्चेस तयार नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. इयत्ता सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांची वेतनश्रेणीच मंजूर नाही. अनुदानावरच्या शाळांना १०० टक्क्या ऐवजी २५ टक्के अनुदान मंजूर करून नागपूर विभागातील एकही शाळा अनुदानासाठी पात्र केली नाही यासह अनेक समस्यांसाठी माध्यमिक शिक्षक संघ रस्त्यावर उतरणार असल्याचे डायगव्हाणे यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवरील प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली, विविध प्रकारचे आंदोलन केले, यानंतरही शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले गेले नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याचा पवित्रा या शिक्षकांनी घेतला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)