जवळा तलाठी कार्यालयात लागले दरपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:14 IST2019-07-31T23:14:01+5:302019-07-31T23:14:35+5:30
तलाठी व शेतकरी यांचे नाते अत्यंत दृढ असते. गाव पातळीवर तलाठी अनेक कामे करतात. त्यांच्याकडून विविध प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. मात्र अनेक ठिकाणी तलाठ्यांकडून आर्थिक लूट केली जाते, अशी ओरड असते.

जवळा तलाठी कार्यालयात लागले दरपत्रक
हरीओम बघेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तलाठी व शेतकरी यांचे नाते अत्यंत दृढ असते. गाव पातळीवर तलाठी अनेक कामे करतात. त्यांच्याकडून विविध प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. मात्र अनेक ठिकाणी तलाठ्यांकडून आर्थिक लूट केली जाते, अशी ओरड असते. याला छेद देत तालुक्यातील जवळा येथील तलाठ्याने प्रत्येक कामाचे दरपत्रक प्रकाशित करून पारदर्शीपणाचा प्रत्यय दिला आहे.
शेतीशी संबंधित विविध प्रमाणपत्र, कागदपत्रे, सात-बारा, फेरफार, नाव नोंदणी, नाव काढणे आदी कामे गावपातळीवर तलाठी करतो. या कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे येरझारा माराव्या लागतात. ही कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे देण्यासाठी शासनाने शुल्क ठरवून दिले आहे. मात्र शुल्क भरूही शेतकरी, नागरिकांना प्रमाणपत्रे मिळत नाही. परिणामी अनेकदा जादा पैसे मौजून प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. त्यासाठीच अनेक तलाठी शेतकरी, नागरिकांना मुद्दाम त्रास देतात. अखेर हेलपाट्यांना त्रासून शेतकरी जादा पैसे देऊन काम करवून घेतात, असे सर्वत्र सांगितले जाते.
अनेकदा तर तलाठ्यांच्या हाताखाली काम करणाºयांचेही खिसे भरावे लागतात. यातून आर्थिक लूट होते, अशी ओरड असते. यातून अनेकदा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तावडीतही सापडतात. मात्र त्यांची लाच घेण्याची प्रवृत्ती काही कमी होत नाही. फेरफारसाठी तर हमखास लाच द्यावी लागते, असा शेतकºयांचा अनुभव आहे. मात्र जवळा येथील तलाठी शाम रणनवरे यांनी शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, त्यांना कोणत्या कामासाठी व प्रमाणपत्रासाठी नेमके किती शुल्क लागते, याची माहिती व्हावी म्हणून आपल्या कार्यालयात चक्क दरपत्रकच लावले. त्यातून अनेक कामांसाठी पैसेच लागत असल्याचे वास्तवही समोर आले. यामुळे शेतकºयांची पिळवणूक थांबली आहे.
इतरांनी आदर्श घ्यावा
तलाठी रणनवरे यांच्या या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे. इतरही तलाठ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक तलाठ्याने आपल्या कार्यालयात शाम रणनवरे यांच्याप्रमाणे शासकीय दरपत्रक लावावे, अशी अपेक्षा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनीही व्यक्त केली आहे.