राज्य शासनाच्या ‘जलभूषण’ पुरस्कारावरून तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:00:21+5:30
१४ जुलै २०२० रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ‘जलभूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही. मात्र राज्य शासनाने यापूर्वीच जलक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या नावाने दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात ‘जलसंधारण दिन’ जाहीर केला होता.

राज्य शासनाच्या ‘जलभूषण’ पुरस्कारावरून तांडव
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्यासंबंधीचा अध्यादेश शासनाने काढला. मात्र संपूर्ण राज्यात जलक्रांती व जलसंधारणाचे कार्य माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनीच केले. त्यामुळे ‘तो’ अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी येथील बंजारा समाज व विविध सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्य शासनाने १२ जून २०२० रोजी अध्यादेश काढला. १४ जुलै २०२० रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ‘जलभूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही. मात्र राज्य शासनाने यापूर्वीच जलक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या नावाने दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात ‘जलसंधारण दिन’ जाहीर केला होता.
सुधाकरराव नाईक यांनी अथक परिश्रम घेऊन राज्यात जलक्रांती केली. त्यांनी जलचळवळीला जनचळवळीचे स्वरूप दिले होते. राज्यात त्यांना जलक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. मात्र आता दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. हा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा श्रेयवाद निर्माण करण्याचा प्रकार असल्याची भावना तालुक्यातील बंजारा बांधव व विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
विविध सामाजिक संघटनांचा विरोध
राज्य शासनाने काढलेला १२ जूनचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी बंजारा समाज बांधव व विविध सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी मनीष जाधव, प्रा.संजय चव्हाण, सिम्पल राठोड, पंजाब चव्हाण, राजाराम राठोड, के.डी. राठोड, कमलसिंग राठोड, अरविंद चव्हाण, प्रा.उल्हास चव्हाण, जयसिंग राठोड, अॅड.दिनेश राठोड, श्रीकांत चव्हाण, संजय आडे, अविनाश राठोड, विकास राठोड, साहेबराव चव्हाण, राम राठोड, अर्जुन राठोड, विजय जाधव आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व बंजारा समाज बांधव उपस्थित होते.
जलक्रांतीने जागविल्या स्मृती
दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात संपूर्ण राज्यात जलक्रांतीची चळवळ राबविली. त्यामुळेच त्यांना राज्यभर जलक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. त्यांच्या स्मृतिदिनी जलभूषण पुरस्कार दिला जातो. त्यातून त्यांच्या स्मृती जागविल्या जातात. आता नाम बदलावरून वादंग पेटले आहे.