कापूस हजारोंचा अन् मशीन घ्या लाखाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 22:12 IST2019-01-05T22:10:29+5:302019-01-05T22:12:11+5:30
सांग पाटला काय करू, उपड पऱ्हाटी पेर गहू... जिल्ह्यात ही म्हण नवी नाही. पण यंदा तीच म्हण कृषी विभाग शेतकऱ्यांवर थोपवित आहे. अन् थोपवित असल्याने शेतकरीही कानाडोळा करीत आहे. बोंडअळी नष्ट करण्यासाठी कृषी विभागाने उभ्या पऱ्हाट्या कापण्याचे आवाहन करीत कॉटन श्रेडर यंत्र खरेदीचा धोशा लावला आहे.

कापूस हजारोंचा अन् मशीन घ्या लाखाची
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सांग पाटला काय करू, उपड पऱ्हाटी पेर गहू... जिल्ह्यात ही म्हण नवी नाही. पण यंदा तीच म्हण कृषी विभाग शेतकऱ्यांवर थोपवित आहे. अन् थोपवित असल्याने शेतकरीही कानाडोळा करीत आहे. बोंडअळी नष्ट करण्यासाठी कृषी विभागाने उभ्या पऱ्हाट्या कापण्याचे आवाहन करीत कॉटन श्रेडर यंत्र खरेदीचा धोशा लावला आहे. पण मजुरी फेडण्याची सोय नसलेले शेतकरी दोन लाखांचे यंत्र कसे खरेदी करतील हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुढच्या वर्षी कापसावर बोंडअळीचा हल्ला होऊ नये, यासाठी कृषी विभागाने यंदा शेतकºयांना जालीम उपाय सूचविला आहे. सध्या शेतात उभी असलेली पऱ्हाटी तातडीने उपटून टाका, नष्ट करा, अशी जनजागृती केली जात आहे. दरवेळी उन्हाळ्यापर्यंत पऱ्हाटी उभी ठेवून जादा वेचे काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, अशा उभ्या पऱ्हाटीतच बोंडअळी सुप्तावस्थेत शिल्लक राहते आणि पुढच्या हंगामात तिचा उपद्रव वाढतो. त्यामुळे सध्याची पऱ्हाटी तातडीने नष्ट करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. ही पऱ्हाटी तातडीने नष्ट करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेतून प्रत्येक तालुक्यात किमान पाच शेतकऱ्यांनी ‘कॉटन श्रेडर’ यंत्र खरेदी करावे, असे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
प्रत्यक्षात जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. १६ तालुके मिळून ६४ श्रेडर खरेदी झाले तरी समूळ पऱ्हाटी तातडीने नष्ट होणे शक्य नाही. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, कृषी विभागाच्या आवाहनाला महिना लोटल्यावरही शेतकऱ्यांनी कॉटन श्रेडर खरेदीच केले नाही. अनुदानासाठी अर्जही केले नाही. कारण, एकतर हे यंत्रच सुमारे दोन लाखांचे आहे. त्यासाठी कृषी विभाग मागासवर्गीय शेतकऱ्यांना ५० टक्के व इतर शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान देणार आहे. मात्र, उर्वरित एक लाख रुपयांची तजवीज कुठून करावी, हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. दुसरे म्हणजे, यंदा कापसाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षाही कमी येण्याची धास्ती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे उभी पऱ्हाटी नष्ट करण्यापेक्षा आणखी एखादा वेचा निघेलच, या आशेवर बहुतांश शेतकरी आहेत.
महिना उलटला, तरी अर्जच नाही
पऱ्हाट्या नष्ट करण्यासाठी अनुदानावर कॉटन श्रेडर यंत्र घेण्याचे आवाहन महिनाभरापूर्वीच कृषी विभागाने केले. मात्र महिना उलटूनही बोटावर मोजण्याइतक्याही शेतकऱ्यांनी अनुुदानासाठी अर्ज केले नाही. लाखात किंमत असलेले महागडे यंत्र तेही ट्रॅक्टरच्या आधारेच चालणारे आहे. तर निघणारा कापूस विकूनही केवळ ५०-६० हजार शेतकऱ्यांच्या हाती येणार, त्यातही देणीच अधिक आहे. त्यामुळे कापूस नष्ट करण्याचे यंत्र खरेदी करण्याकडे दुर्लक्ष आहे. पण शेतकऱ्यांनी श्रेडरसाठी अर्ज करावे, आम्ही सर्वांनाच अनुदान देऊ, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांनी केले.