अटकपूर्व जामिनासाठी धडपड
By Admin | Updated: January 4, 2015 23:20 IST2015-01-04T23:20:31+5:302015-01-04T23:20:31+5:30
येथील दारव्हा मार्गावरील हॉटेलमध्ये गोळीबारप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या टाईल्स व्यावसायिकाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र हॉटेल मालक अद्यापही गोंधळलेल्या अवस्थेत आहे.

अटकपूर्व जामिनासाठी धडपड
गोळीबाराचे प्रकरण : हॉटेल मालकाची संभ्रमावस्था कायम
यवतमाळ : येथील दारव्हा मार्गावरील हॉटेलमध्ये गोळीबारप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या टाईल्स व्यावसायिकाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र हॉटेल मालक अद्यापही गोंधळलेल्या अवस्थेत आहे.
येथील दारव्हा मार्गावरील रेवती प्राईड हॉटेलमध्ये परवाना प्राप्त पीस्तुलातून गोळीबार झाला होता. सुदैवाने सुटलेली गोळी एका काचेला लागली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शहर पोलिसांनी या घटनेची चौकशी केली. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. या बयाणात टाईल्स व्यावसायिक राजू उर्फ सचिन व्यास याने गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले. मात्र घटनेचा सबळ पुरावा असलेले घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज डीलिट करण्यात आले. त्यामध्ये हॉटेल व्यावसायिकाची महत्त्वाची भूमिका असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी अथवा तपासात तो कारवाईच्या कचाट्यात सापडू शकतो. याची जाणिव त्याला आहे. टाईल्स व्यावसायिकाविरूध्द गुन्हा नोंद तर हॉटेल मालकावर कारवाईची टांगती तलवार अशा स्थितीत ते दोघेही सापडले आहे. त्यामुळे पोलिसांच्या भीतीपायी आणि अटक टाळण्यासाठी गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागलेला टाईल्स व्यावसायिक राजू व्यास याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालय धाव घेतली आहे. मात्र हॉटेल व्यावसायिकावर कुठलीही पोलीस कारवाई अद्याप झाली नसल्याने त्याच्यापुढे संभ्रम कायम आहे. मात्र पोलीस दोघांचाही शोध घेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)