स्वाभिमानीच्या दाव्यामुळे महायुतीची झाली कोंडी
By Admin | Updated: June 24, 2014 00:06 IST2014-06-24T00:06:59+5:302014-06-24T00:06:59+5:30
महायुतीत सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वणी विधानसभेवर दावा सांगितल्याने महायुतीची ‘गोची’ झाली आहे. तूर्तास वणीची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला असून स्वाभिमानीच्या दाव्यामुळे

स्वाभिमानीच्या दाव्यामुळे महायुतीची झाली कोंडी
रवींद्र चांदेकर - वणी
महायुतीत सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वणी विधानसभेवर दावा सांगितल्याने महायुतीची ‘गोची’ झाली आहे. तूर्तास वणीची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला असून स्वाभिमानीच्या दाव्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. भाजप मात्र वरकरणी शांत दिसत आहे.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता सर्वच पक्ष कामाला लागले आहे. निवडणूक जेमतेम चार महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय झाले आहे. राजकीय खलबते रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने भाजपाचे हंसराज अहीर यांना तारल्याने विधानसभेत महायुती बाजी मारेल, अशी हवा तयार करण्यात येत आहे. महायुतीत वणी विधानसभेची जागा सध्या शिवसेनेच्या वाट्याला आहे. मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वास नांदेकर पराभूत झाले, असे सांगत प्रथम युतीतील भाजपाने वणीवर आपला दावा ठोकला. त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे अधिकृत मागणीही करण्यात आली.
भाजपाच्या दाव्यानंतर आता महायुतीत सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही वणीवर आपला दावा ठोकला आहे. स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते गजानन अहमदाबादकर यांनी वणीत हा दावा जाहीरही केला. स्वाभिमानीच्या या अचानकच्या दाव्यामुळे आता शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. महायुतीचे जागा वाटप अद्याप झाले नाही. मात्र जागा वाटपाच्या वेळी वणीचा मुद्दा आता नक्कीच उपस्थित होणार आहे.
महायुतीत वाटेकरी वाढल्याने युतीची गोची झाली आहे. वणीवर खरा हक्क आमचाच असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. मात्र आता स्वाभिमानीने सेनेच्या मार्गात अडसर निर्माण केला. कदाचित त्याला भाजपाची छुपी साथ असावी, असा कयास लावला जात आहे. भाजपाच्या गोटात मात्र कमालीची शांतता पाहायला मिळत आहे.
केवळ पक्ष स्तरावर वणीची जागा मागून त्यांनी आपले ‘पिल्लू’ सोडून दिले आहे. त्यानंतर भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शांत बसले आहेत. त्यांच्या मनात नेमकश काय सुरू आहे, याचा कुणालाच थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे महायुतीत सर्व काही ठिकठाक आहे, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.