Suspected identity card given by 'ST' | ‘एसटी’नेच दिलेल्या ओळखपत्रावर संशय
‘एसटी’नेच दिलेल्या ओळखपत्रावर संशय

ठळक मुद्देठोस कारण सांगतच नाही : आता वाहक देतात मेडिकल प्रमाणपत्र बाळगण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खुद्द महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दिलेले प्रवास सवलतीचे ओळखपत्रही बोगस ठरविले जात आहे. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता प्रवाशांना तिकीटाचा भुर्दंड दिला जात आहे. आता तर सवलतधारकांना मेडिकल प्रमाणपत्र बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. यावरून एसटी कर्मचारी महामंडळाच्या कामावरही साशंक असल्याचे स्पष्ट होते.
शासनाच्या माध्यमातून एसटी महामंडळ ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, विविध पुरस्कार प्राप्त नागरिक, दिव्यांग, गंभीर आजार आदी प्रकारच्या नागरिकांना प्रवाशांना सवलत प्रवास देत आहे. यासाठी संबंधित विभागाकडून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे महामंडळाकडून प्रवास सवलतीचे ओळखपत्र दिले जाते. मात्र अलीकडे बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सवलतीत प्रवास करण्याचे प्रमाण वाढले असल्याची ओरड केली जात आहे. काही प्रकरणात याविषयी कारवाईसुद्धा करण्यात आली. काही अधिकाऱ्यांवर रिकव्हरी निघाली. याचाच सूड म्हणून की काय, खुद्द एसटीने प्रमाणित केलेले ओळखपत्रही बोगस ठरविले जात आहे.
दिव्यांगांना मेडिकल बोर्डाच्या प्रमाणपत्राच्या आधारे समाज कल्याण विभागाकडून प्रमाणित झाल्यानंतर एसटीची प्रवास सवलत प्रदान केली जाते. अनेक नागरिकांनी अतिशय प्रामाणिकपणे ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. या प्रामाणिक लोकांवरही महामंडळाच्या काही वाहकांकडून बोगसचा ठपका ठेवला जात आहे. यासाठी कारण मात्र स्पष्टपणे सांगितले जात नाही. बोगस आहे एवढे सांगूनच या प्रवाशांना तिकीट काढण्याची सक्ती केली जाते. कार्डातील नेमका बोगसपणा कोणता हे सांगण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहकांना आवश्यक त्या सूचना करणे अपेक्षित आहे.

कर्मचाºयांच्या चुका, विद्यार्थ्यांना त्रास
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया सवलत पासमध्ये अनेक प्रकारच्या चुका कर्मचाऱ्याकडून ठेवल्या जात आहे. काही वाहकांकडून या चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर बसविला जात आहे. तारीख चुकीची नोंदविणे, अधिकाऱ्याचा शिक्का नसणे आदी प्रकार घडले आहेत. बसमधून उतरविण्यापर्यंतची कारवाई काही वाहकांकडून केली जात आहे. यासाठी काळजीपूर्वक काम करण्याची तसदी महामंडळाच्या कर्मचाºयांनी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Suspected identity card given by 'ST'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.