‘वसंत’साठी ऊस उत्पादकांचे रणशिंग

By Admin | Updated: September 27, 2015 02:01 IST2015-09-27T02:01:33+5:302015-09-27T02:01:33+5:30

विदर्भात सहकारी तत्वावर सुरू असलेल्या एकमेव वसंत साखर कारखान्यासाठी सर्व पक्षाचे नेते एकवटले आहे.

Sugarcane Manufacturers' Trumpet For 'Vasant' | ‘वसंत’साठी ऊस उत्पादकांचे रणशिंग

‘वसंत’साठी ऊस उत्पादकांचे रणशिंग

पक्षभेद विसरून नेते एकवटले : हजारो शेतकऱ्यांची मेळाव्यामध्ये उपस्थिती
उमरखेड : विदर्भात सहकारी तत्वावर सुरू असलेल्या एकमेव वसंत साखर कारखान्यासाठी सर्व पक्षाचे नेते एकवटले आहे. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही कारखान्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. या एकीच्या भावनेचे दर्शन शनिवारी झालेल्या मेळाव्यात घडले. हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या ऊस उत्पादकांनी कारखाना प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.
यावर्षीचा गळीत हंगाम सुरू व्हावा यासाठी संचालक मंडळाकडून कुठलाही पाठपुरावा केला जात नाही. म्हणून ऊस उत्पादक सभासद संघाने पोफाळी येथील कारखाना साईडवर मेळावा घेतला. मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर होते. आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, तातू देशमुख, राम देवसरकर, पंजाबराव खडकेकर, संदीप हिंगमिरे, साहेबराव कदम, बाळासाहेब चंद्रे यांच्यासोबत सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. वसंत साखर कारखाना जिवंत राहिला पाहिजे यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे, असे मत अनेकांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. आमदार नजरधने यांनी सांगितले की, ११ महिन्यांपासून पगार नाही, पगारासह इतर कामगारांना कारखान्याकडून जवळपास पाच कोटी येणे आहे. ऊस उत्पादक सभासदांना ऊसाचा भाव फरक ३०० रुपये प्रती टन याप्रमाणे सहा कोटी ५० लाख, ऊस तोडणी ठेकेदार व वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांना दोन कोटी, कामगारांचा प्रॉव्हिडंड फंड एक कोटी, साखरेचे पोते तारणावर घेतलेले ३५ कोटी, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पूर्व हंगामासाठी घेतलेले सात कोटी असे एकंदर ६० कोटी देणे आहे. एवढे कर्ज विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाने कारखान्यावर करून ठेवले आहे. तरीही कारखाना सुरू व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे.
राम देवसरकर यांनी विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाने कारखाना डबघाईस आणल्याचा आरोप केला. कारखान्याच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार उत्तमराव इंगळे, तातू देशमुख, भीमराव चंद्रवंशी, पंजाबराव खडकेकर, डॉ. गणेश घोडेकर आदींनीही विचार मांडले. कारखाना चालू करण्यासाठी उपस्थितांपुढे सूचना मांडल्या. गेल्या ४५ वर्षात प्रथमच वसंत कारखान्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. उमरखेड, महागाव, पुसद, हदगाव, हिमायतनगर या पाच तालुक्यातील १८ हजार ऊस उत्पादक सभासद आहेत. त्यांच्याकडे एकूण सहा लाख मे.टन ऊस उभा आहे. शेतामध्ये तो गाळपासाठी वसंत कारखान्याला दिला जातो. यावर्षी जर कारखाना बंद पडला तर ऊस उत्पादकांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे सर्व सभासदांनी एकत्र राहून कारखाना टिकविण्यासाठी सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, डॉ. विठ्ठलराव चव्हाण, जगदीश नरवाडे, कल्याणराव माने, रमेश चव्हाण, चितांगराव कदम, अ‍ॅड़ माधवराव माने, देवराव दिवसे, अनंतराव चिकने, किशोर ठाकुर, रामराव गायकवाड, डॉ. धोंडेराव बोरूळकर, नितीन भुतडा, नागोराव कदम, बालाजी वानखेडे, विलास चव्हाण, डॉ. अनिल कनवाळे, शामराव सुरोशे, उत्तमराव राठोड, कामगार नेते पी.के. मुडे यांच्यासह सर्वच पक्षातील नेते मंडळी उपस्थित होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Sugarcane Manufacturers' Trumpet For 'Vasant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.