लालपरीचा अचानक एअर प्रेशर पाइप तुटला अन्...; थोडक्यात बचावले ३२ प्रवासी सुखरूप
By विलास गावंडे | Published: October 21, 2023 11:53 PM2023-10-21T23:53:53+5:302023-10-21T23:54:31+5:30
हा प्रकार शनिवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास यवतमाळ ते धामणगाव मार्गावरील करळगाव घाटात घडला.
बाभूळगाव (यवतमाळ) : एसटी बस घाट चढत होती. अचानक एअर प्रेशर पाइप तुटला अन् ब्रेक निकामी झाले. पण, चालकाने प्रसंगावधान राखले. १५० फूट बस मागे उतरवत पहाडावर आदळली. यामुळे ३२ प्रवाशी सुखरूप बचावले. हा प्रकार शनिवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास यवतमाळ ते धामणगाव मार्गावरील करळगाव घाटात घडला.
त्याचे असे झाले की, एम.एच.४०/८०८९ या क्रमांकाची बस धामणगावहून यवतमाळकडे येत होती. या बसमध्ये ३२ प्रवासी होते. करळगावचा घाट चढत असताना एका वळणावर या बसचा रबरी एअर पाइप फुटला. त्याचवेळी ही बस उतारात मागे सरायला लागली. जवळपास १५० फूटपर्यंत चालकाने ही बस नियंत्रणात आणत घाटातील पहाडावर मागील बाजूने धडकविली. या प्रकारात बसमधील चार ते पाच प्रवाशांना दुखापत झाली.
या बसच्या एअर प्रेशर पाइपला जॉइंटर लावण्यात आले होते. वास्तविक असा प्रकार पाइप फुटल्यानंतर तात्पुरती सोय म्हणून केला जातो. घटनास्थळापासून बस आगारापर्यंत आणण्यासाठीची ही सोय असते. परंतु नवीन पाइप न लावता जॉइंटरच्या भरवशावर काम भागविले जात आहे. हा प्रकार प्रवाशांच्या जिवावर उठणारा ठरत आहे.