विद्यार्थी, युवक जाताहेत नशेच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:43 AM2021-09-11T04:43:11+5:302021-09-11T04:43:11+5:30

अविनाश खंदारे उमरखेड : शहराच्या भोवताली लेआऊटचा गराडा पडला आहे. हे लेआऊट आणि नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्ग अवैध धंद्यांचे माहेरघर बनले ...

Students, young people go on a drunken diet | विद्यार्थी, युवक जाताहेत नशेच्या आहारी

विद्यार्थी, युवक जाताहेत नशेच्या आहारी

Next

अविनाश खंदारे

उमरखेड : शहराच्या भोवताली लेआऊटचा गराडा पडला आहे. हे लेआऊट आणि नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्ग अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे. अनेक शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक या निर्जनस्थळी नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे प्रशासन व पालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

शहराचा दिवसेंदिवस झपाट्याने विस्तार होत आहे. आता सभोवताली नवीन ले-आऊट निर्माण झाले आहे. नांदेड, ढाणकी, महागाव, पुसद रोड परिसरात मोठ्या प्रमाणात ले-आऊट आहे. जिल्हा परिषद शाळेचे मोठे मैदान आहे. या ठिकाणी शेकडो युवक नशा करण्यासाठी येतात. याबाबत जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी अनेकदा पोलीस ठाण्यासोबत पत्रव्यवहार केला; परंतु त्यावर काहीच उपाययोजना झाली नाही.

पुसद रोडवरील जिन प्रेस कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे युवकांची नशा करण्यासाठी वर्दळ असते. अनेक ले-आऊटमध्ये अद्याप प्लॉट रिकामे आहे. कुणी बांधकाम केले नाही. त्यामुळे बहुतांश ले-आऊट निर्जन आहे. सभोवताली असलेले हे लेआऊट आता अवैध धंद्यांचे अड्डे बनल्याचे दिसत आहे. परिसर निर्जन असल्याने अनेक युवक टाइमपास म्हणून आलो असे सांगत तेथे नशा करताना दिसून येतात. एक प्रकारे हे लेआऊट नशा करण्याचे पॉइंट ठरले आहे. या निर्जनस्थळी, तसेच बायपासवर अनेक विद्यार्थी व महाविद्यालयीन युवकांसह शहरातील काही युवकांची वर्दळ वाढली आहे. काही गुन्हेगारी प्रवृतीचे युवकही या निर्जन स्थळी ये-जा करीत असल्याची चर्चा आहे.

बॉक्स

पालकांनी जागृत होण्याची आवश्यकता

शहरातील अनेक लेआऊटमध्ये आक्षेपार्ह वस्तू आढळून येत आहेत. सिगारेटचे जळालेले तुकडे, गुटखा पुड्या, देशी व विदेशी दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. विशेष म्हणजे यात विद्यार्थी व महाविद्यालयीन युवकांचा मोठ्या प्रमाणात असलेला सहभाग पालकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे पालकांनीही जागृत होणे काळाची गरज आहे.

बॉक्स

पोलिसांनी लक्ष देण्याची गरज

शहराभोवतालच्या ले-आऊटमध्ये अनेक गैरप्रकार चालत आहेत. त्याकडे पालक व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ले-आऊटमध्ये येणाऱ्या अनेकांजवळ महागडे मोबाइल व वाहने दिसतात. सायंकाळनंतर तेथे तरुणांची वर्दळ वाढते. त्याला पोलिसांनी आळा घालण्याची गरज आहे. पालकांनीही आपल्या पाल्याच्या कृतींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे.

बॉक्स

सामाजिक संघटनांची चुप्पी धोकादायक

शहरात अनेक सामाजिक संघटना आहेत; परंतु खुल्या लेआऊट व निर्जनस्थळी अनेक गैरप्रकार होत असताना त्या चुप्पी साधून आहे. त्यांची ही चुप्पी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. युवापिढीला जागृत करण्यासाठी आणि होत असलेल्या गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी सामाजिक संघटनांनी समोर येणे गरजेचे आहे.

कोट

शहरातील सर्व लेआऊट आणि निर्जळस्थळांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. पोलिसांचे खास एक पथक तयार केले आहे. नशा आणि अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनीही जागृत राहून पोलिसांना कुठेही गैरप्रकार होत असल्यास माहिती द्यावी.

अमोल माळवे, ठाणेदार, उमरखेड

Web Title: Students, young people go on a drunken diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.