The ST's wheel hit a stone and injured several passengers | एसटीच्या चाकाने दगड उडून अनेक प्रवासी जखमी
एसटीच्या चाकाने दगड उडून अनेक प्रवासी जखमी

ठळक मुद्देप्रवाशांच्या जिविताला धोका : नव्या बसस्थानकात दगडांचा खच

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील बसस्थानकाच्या जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालय परिसरात बसस्थानक उभारण्यात आले आहे. याठिकाणी व्यवस्था करताना प्रचंड घिसाडघाई केल्याचे दिसून येते. या परिसरात सर्वत्र टोळगोटे (गोलदगड) टाकलेले आहेत. या दगडांमुळे प्रवाशांचा कपाळमोक्ष होत आहे. अनेकजण जखमी झाले आहेत.
जिल्हा मुख्यालयाचे बसस्थानक असल्याने येथे बसगाड्यांची सतत वर्दळ असते. एसटी बस बसस्थानकात शिरताना अथवा बाहेर पडताना टायरच्या खाली आलेला गोल दगड सुसाट वेगाने निसटून प्रवाशांचा वेध घेत आहे. कधी कोणत्या बसच्या टायरखालून दगड येऊन डोक्याला लागेल याचा नेम नाही. तात्पुरत्या बसस्थानकात मर्यादित जागा असल्याने प्रवाशांचे घोळके सर्वत्र असतात. त्यामुळे एसटी बसच्या टायरखालून सुटलेला दगड कुणाला ना कुणाला जखमी केल्याशिवाय राहात नाही. अशा जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पाच-सहा दिवसांपूर्वीच हे बसस्थानक वापरात घेतले आहे. मात्र याठिकाणी काम करताना नियोजनशून्यता असल्याचे दिसून येते. बसस्थानक परिसरात किमान दगडाची चुरी अंथरणे अपेक्षित होते. त्याऐवजी खदाणीतून निघालेला दगड याठिकाणी टाकण्यात आला. आता हाच दगड प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. या परिसरात पायदळ फिरताही येत नाही. शिवाय फलाटावर बसून एसटीची वाट पाहणेही सुरक्षित नाही. कधी कोण्या बाजूने दगड येईल याचा नेम नाही. प्रवासाला निघालेल्या अनेकांना कपाळमोक्ष झाल्याने घरी परत जावे लागले. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या जीविताचा व सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या बांधकाम विभागाकडे आतापर्यंत चार पत्र दिले आहेत. दगडांची समस्या गंभीर असून तातडीने उपाययोजनेची गरज आहे. यासाठी आगार प्रमुख म्हणून माझ्या स्तरावरून केवळ पाठपुरावा करण्याचा अधिकार आहे. तो सातत्याने सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास येथे काम होऊ शकते.
- रमेश उईके, यवतमाळ आगार प्रमुख

Web Title: The ST's wheel hit a stone and injured several passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.