मोदी लाट टिकविण्यासाठी धडपड
By Admin | Updated: May 25, 2014 23:52 IST2014-05-25T23:52:34+5:302014-05-25T23:52:34+5:30
नरेंद्र मोदींची लोकसभेतील लाट विधानसभेतही कायम ठेवता यावी यासाठी जिल्ह्यातील भाजपा-शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि नेते मंडळी कामाला लागली आहे. तर या उलट स्थिती काँग्रेसमध्ये आहे.

मोदी लाट टिकविण्यासाठी धडपड
भाजपा-शिवसेना : यवतमाळवर शिवसेना, राष्ट्रवादीचाही दावा यवतमाळ : नरेंद्र मोदींची लोकसभेतील लाट विधानसभेतही कायम ठेवता यावी यासाठी जिल्ह्यातील भाजपा-शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि नेते मंडळी कामाला लागली आहे. तर या उलट स्थिती काँग्रेसमध्ये आहे. पराभवाने खचलेले काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते अद्यापही घराबाहेर निघालेले नाही. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशात एकहाती सत्ता मिळविल्यानंतर भाजपा-शिवसेनेत महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकविण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. कोणत्याही परिस्थितीत मोदींची ही लाट पाच महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकविण्याचे प्रयत्न केले जात आहे. युतीसाठी हे आव्हान असले तरी काँग्रेसमध्ये कायम असलेली मरगळ लक्षात घेता युतीचे नेते हे आव्हान यशस्वीरीत्या पेलतील, असे चित्र आहे. यवतमाळ जिल्हा आमदारांच्या संख्येनुसार काँग्रेसचा गड असला तरी हा गड उद्ध्वस्त करण्याच्या इराद्याने भाजपा-सेनेची मंडळी वेगाने कामाला लागली आहे. मोदी लाट कॅश करून जुने दिवस पाहण्यासाठी ही सर्व धडपड आहे. जिल्ह्यात सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी आघाडी व युतीच्या अनेक पदाधिकार्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र सर्वाधिक स्पर्धा ही यवतमाळ विधानसभा मतदारसंघात पहायला मिळणार आहे. येथे भाजपाचे माजी आमदार मदन येरावार, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब गाडे पाटील हे प्रमुख दावेदार आहे. येरावार सलग दोन वेळा पराभूत झाल्याने नवा चेहरा द्यावा, अशी मागणी भाजपाच्या एका गटाकडून रेटली जात आहे. विशेष असे ठाकरे व येरावार हे दोघेही भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. गडकरी आपले वजन नेमके कोणाच्या पारड्यात टाकतात यावर उमेदवारी ठरणार आहे. येरावार यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी नाही. कधी काळी त्यांच्या कार्यालयात दिसणारी कार्यकर्त्यांची गर्दी लोप पावली आहे. कारण त्यांनी या कार्यकर्त्यांना रोजगाराचा मार्गच उपलब्ध करुन दिला नाही. पर्यायाने हे कार्यकर्ते पोटासाठी इतरत्र निघून गेले. अशीच काहीशी अवस्था राजाभाऊ ठाकरे यांची आहे. मात्र त्यांच्याकडे किमान समाजाचे पाठबळ आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करीत आणि त्यांच्या चड्डीची जाहीरपणे टर्र्र उडवित भाजपातून बाहेर पडलेल्या राजाभाऊंना संघ परिवार विसरलेला नाही. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या बाबासाहेब गाडे पाटील यांनीही विधानसभा लढविण्यासाठी फिल्डींग लावली आहे. वेळ प्रसंगी बंडखोरी करण्याच्याही तयारीत ते असल्याचे सांगितले जाते. मात्र गेल्या पोटनिवडणुकीत गाडेपाटील आकपुरी वगळता आपल्या बालेकिल्ल्यात मायनस झाल्याने त्यांच्या संघटन कौशल्याचा तेव्हाच फुगा फुटला. त्यामुळेच भाजपाचे येरावार यांना काँग्रेसच्या नंदिनी पारवेकरांकडून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे बंडखोरी केली तरी गाडे पाटील किती इफेक्टीव्ह ठरतात हे पाहणे महत्वाचे आहे. येरावार यांना तिकीट नाकारल्यास यवतमाळ नगरपरिषदेतील एक स्वीकृत नगरसेवकही अपक्ष म्हणून विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची कसरत करीत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपातील येरावारसह अन्य असंतुष्टांचा छुपा पाठिंबा हे या नगरसेवकाचे पाठबळ राहणार आहे. येरावार यांना उमेदवारी मिळाल्यास नगरपरिषदेतील काँग्रेस सर्मथित भाजपा नेतेही त्यांना ‘हात’ दाखविण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते. त्यातच शिवसेनेने पुसद भाजपाला सोडण्याची तयारी दर्शवून यवतमाळवर दावा सांगितल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसले तरी नुकतेच बढती मिळालेले काही पदाधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. एकूणच शिवसेना व राष्ट्रवादीचा दावा, काँग्रेस व भाजपातील इच्छुकांचा वाढता आकडा लक्षात घेता यवतमाळची आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, एवढे निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)