बियाणे खरेदीचा व्यवहार ठप्प

By Admin | Updated: June 6, 2017 01:28 IST2017-06-06T01:28:14+5:302017-06-06T01:28:14+5:30

जिल्ह्यात खरीपाची आठ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. मे अखेर पर्यंतच बियाणे खरेदीची शेतकऱ्यांकडून लगबग केली जाते.

Stop the purchase of seeds | बियाणे खरेदीचा व्यवहार ठप्प

बियाणे खरेदीचा व्यवहार ठप्प

कॅश नसल्याचा फटका : ३०० कोटींची उलाढाल थांबली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात खरीपाची आठ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. मे अखेर पर्यंतच बियाणे खरेदीची शेतकऱ्यांकडून लगबग केली जाते. मात्र यंदा कॅशलेस व्यवस्थेने हा बाजार कोलमडला आहे. जूनचा पहिला आठवडा सुरू होऊनही शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीला सुरूवातही नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रोख मिळत नाही, त्यांनी कृषी केंद्र चालकाच्या खात्यात आरटीजीएस करण्यासही मनाई केल्याने जवळपास साडेतीनशे कोटींची उलाढाल थांबली आहे.
शेतकऱ्यांची खरीपातील बियाणे खरेदीची भिस्त ही तूर आणि भुईमूग या प्रमुख पिकांवर अवलंबून असते. कापूस आणि सोयाबिन मधून जुनी देणी दिली जाते. दैनंदिन गरजा भागविण्यावर या पिकांतून आलेली रक्कम खर्च होते. खरीपाच्या पेरणीसाठी तूर व उन्हाळी भुईमूगच ठेवल्या जातो. यावर्षी दोन्ही पिकात शेतकऱ्यांची फसगत झाली. तुरीला बाजारात किंमत नाही, नाबार्डकडे विकली तर पैसा नाही अशी स्थिती आहे. भुईमूगात तर शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही हाती येणे शक्य नाही. अशा स्थितीत शेतकरी बियाणे खरेदीसाठी बाजाराकडे फिरकलाच नाही. केवळ खत खरेदीसाठी शासन पॉस मशिन लावणार असल्याने शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी करण्यात आली आहे. शासनाने खताच्या खरेदीवर नियंत्रण घातल्याने शेतकरी धास्तावून आहेत.
मागील वर्षी मे महिन्यातच बियाणे खरेदीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ८० टक्के खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली होती. यातून साडेतीनशे कोटींची आर्थिक उलाढाल झाली. यावर्षी मंदीसदृश्य स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांचा बँकेत अडकून पडला आहे. बहुतांश शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा खातेधारक आहे. ही बँक शेतकऱ्यांच्या खात्यातून कृषी केंद्र चालकाच्या खात्यात आरटीजीएस करण्यास तयार नाही. त्यामुळे बियाण्याचे मोठे आणि छोटे वितरक सुध्दा अडचणीत आहेत. शेतकरी बियाणे खरेदीसाठी केव्हा बाहेर पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांनी मोठी आर्थिक गुतंवणूक करून ठेवली असून आता व्यापारी सुध्दा अडचणीत सापडला आहे.
बँकांनी शेतकऱ्यांना झटपट पीककर्ज मंजूर करून रोख रक्कम दिल्या शिवाय बियाणे खरेदीचा बाजार खुलणार नाही, अशी स्थिती आहे. मान्सून सक्रीय झाला असून जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यानंतरही शेतकरी बाजारात फिरकताना दिसत नाही. यामुळे बियाणे विक्रेत्या व्यापाऱ्यांनाही हूर-हूर सुटली आहे.

Web Title: Stop the purchase of seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.