यवतमाळात पोलीस भरतीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:12 IST2018-03-12T22:12:02+5:302018-03-12T22:12:02+5:30
जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या भरतीला येथील पळसवाडी पोलीस कवायत मैदानावर सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या.

यवतमाळात पोलीस भरतीला प्रारंभ
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या भरतीला येथील पळसवाडी पोलीस कवायत मैदानावर सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात ही पोलीस भरती होत असून संपूर्ण प्रक्रिया इनकॅमेरा होत आहे.
यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या ६१ जागांच्या भरतीसाठी तब्बल ११ हजार ५०० उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहाटे ५.३० वाजतापासून या भरतीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांची उंची, छाती मोजण्यात आली. तसेच लांब उडी, गोळाफेक, पुलअप, रनिंग आदी चाचण्या घेण्यात आल्या. ही भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी चाचणीच्या प्रत्येक ठिकाणी दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. तर २३० पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात ही भरती सुरू आहे. सोमवार आणि मंगळवारी प्रत्येकी पाचशे उमेदवारांची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर प्रत्येक दिवशी ७०० उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे.