संतप्त नागरिकांकडून महावितरणवर दगडफेक
By Admin | Updated: July 1, 2014 23:43 IST2014-07-01T23:43:11+5:302014-07-01T23:43:11+5:30
तालुक्यातील घोन्सा येथील ३३ के़व्ही़ वीज उपकेंद्रावर सोमवारी रात्री परिसरातील दहेगाव, सोनेगाव व साखरा येथील संतप्त शेतकरी व नागरिकांनी धडक देऊन दगडफेक केली़ यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण

संतप्त नागरिकांकडून महावितरणवर दगडफेक
वणी : तालुक्यातील घोन्सा येथील ३३ के़व्ही़ वीज उपकेंद्रावर सोमवारी रात्री परिसरातील दहेगाव, सोनेगाव व साखरा येथील संतप्त शेतकरी व नागरिकांनी धडक देऊन दगडफेक केली़ यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून घोन्सा परिसरात भारनियमनाने कहर केला आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पीक जगविण्यासाठी ओलित करणे आवश्यक झाले आहे. मात्र वीज राहात नसल्याने पिकांना पाणी देणेही अशक्य झाले आहे. यामुळे शेतकरी चांगलेच संतापलेले अहेत. याबाबत अनेकदा महावितरणला सूचना दिल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही़ परिणामी शेतकऱ्यांच्या संतापाचा आता बांध फुटला आहे.
पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंता कार्यालयालासमोरही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी अनेकदा आपल्या समस्या मांडल्या होत्या़ तरीही महावितरणतर्फे कोणतीही उपाययोजना करण्यात आलीच नाही. घोन्सा येथील वीज उपकेंद्राअंतर्गत ३५ गावे येतात. त्यातील प्रत्येक गावात दररोज रात्री मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू आहे़ रात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे़ त्याचबरोबर गावातील पिठ गिरणी, विजेवर चालणारी उपकरणे शोभेची वस्तू ठरत आहे़
कृषी पंपांचाही वीज पुरवठा बंद राहत असल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपली आही. त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ ओढवली आहे़ वरूण राजा शेतकऱ्यांवर रूसला असून आता महावितरणही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहे़ या सर्व प्रकारामुळे शेतकरी व ग्रामस्थ चांगलेच कंटाळले आहे़ सुरूवातीला दहेगाव, सोनेगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सोमवारी रात्री ८ वाजता महावितरण कार्यालयावर धडक दिली़ त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून त्यांना शिव्यांची लाखोळी वाहिली़
शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी दगडफेक करायला सुरूवात केली़ त्यात महावितरणच्या सभोवताल लावलेल्या काचा व बल्ब दगडाने फुटले. येथील अभियंतासुध्दा केवळ दर शुक्रवारी येथे येत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या रखडल्या आहे़ त्यांना लहान-मोठ्या तक्रारीसाठी पांढरकवडा व झरीला चकरा माराव्या लागत आहे़ कामचुकार अभियंत्यावर वरिष्ठांनी कारवाई करून कृषी पंपाचा वीज पुरवठा व भारनियमन बंद करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)