एसटी पासचा घोळ संपता संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:15+5:30
तारखेशिवाय देण्यात येणाऱ्या पासचा वापर अमर्याद केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची पास देण्यात येते. त्यानंतर नूतनीकरण करून घ्यावे लागते. तारीख नसलेले पासधारक यासाठी कुठलेही लोड घेत नाही. एकदा पास हाती पडली की अमर्याद कालावधीपर्यंत वापरायची असाच प्रकार सुरू आहे.

एसटी पासचा घोळ संपता संपेना
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रवास सवलत पासमध्ये प्रचंड घोळ सुरू आहे. बोगस स्वाक्षरी, तारीख नसलेल्या, शहरातून खेड्याकडे जाण्यासाठीच्या पास प्रवाशांकडे सापडत आहे. अधिकाऱ्यांचे सुटलेले नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांची कामातील दिरंगाई या प्रकारामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.
बोगस पासची अनेक प्रकरणे विभागात पुढे आलेली आहे. काही लोकांवर कारवाई झाली आहे. कार्डवर असलेली आणि संबंधित अधिकाऱ्याची प्रत्यक्षात असलेली स्वाक्षरी यात बराच फरक आहे. या बाबी स्पष्टपणे पुढे आलेल्या आहे. तरीही कुणावरही कारवाई केली जात नाही. याच प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचीही कामातील दिरंगाई वाढत चालली आहे. चक्क तारीख नसलेल्या पासेस वाटल्या जात आहे.
तारखेशिवाय देण्यात येणाऱ्या पासचा वापर अमर्याद केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची पास देण्यात येते. त्यानंतर नूतनीकरण करून घ्यावे लागते. तारीख नसलेले पासधारक यासाठी कुठलेही लोड घेत नाही. एकदा पास हाती पडली की अमर्याद कालावधीपर्यंत वापरायची असाच प्रकार सुरू आहे. अपवादानेच वाहक याविषयी चौकशी करतात. मात्र या सर्व प्रकारात महामंडळाचे नुकसान होत आहे.
महामंडळाच्या बसमध्ये दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रवास सवलतीचा पैसा शासनाकडून मिळतो. परंतु पासची योग्य नोंद होत नसल्याने काही बाबतीत या महसुलाला महामंडळाला मुकावे लागते. बोगस पासची नोंदणी कुठेच सापडत नाही. अशाच पासच्या भरवशावर प्रवास केला जातो. पैसा मात्र महामंडळाला मिळत नाही. या सर्व बाबींविषयी महामंडळाच्या सर्वांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.