एसटी महामंडळाचा ‘कणा’ खिळखिळा, तोकड्या कर्मचाऱ्यांवर वाहतुकीचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 22:31 IST2025-10-27T22:28:40+5:302025-10-27T22:31:23+5:30
महामंडळाच्या जवळपास सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात सहायक वाहतूक अधीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक ही पदे रिक्त आहेत.

एसटी महामंडळाचा ‘कणा’ खिळखिळा, तोकड्या कर्मचाऱ्यांवर वाहतुकीचे नियोजन
विलास गावंडे
यवतमाळ : वाहतूक शाखेला एसटी महामंडळाचा ‘कणा’ मानले जाते. तोकड्या कर्मचाऱ्यांमुळे हा कणा खिळखिळा झाला आहे. अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. परिणामी, महामंडळाचे आर्थिक नुकसानही होत आहे. खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न महामंडळाला मिळत नाही. अशावेळी वाहतूक शाखा सक्षम असावी, अशी अपेक्षा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
महामंडळाच्या जवळपास सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात सहायक वाहतूक अधीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक ही पदे रिक्त आहेत. चालक, वाहकांचा वापर करून या पदांची कामे करून घेतली जात आहेत. परंतु, बसगाड्यांवर या कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अतिकालीक भत्त्याची कामगिरी द्यावी लागत आहे. यामध्ये महामंडळाचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
नियोजन, व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष
सहायक वाहतूक अधीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक या पदांचा तुटवडा असल्याने वाहतूक नियोजन आणि बसस्थानक व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. परिणामी, अवैध प्रवासी वाहतूक, प्रवासी सुरक्षितता, वाहतूक फेऱ्यांची वारंवारिता, समांतर वाहतूक, जादा वाहतुकीचे नियोजन, अवैध फेरीवाल्यांचा धुमाकूळ आदी बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. या बाबी महामंडळाच्या हिताला बाधा आणणाऱ्या ठरत आहेत.
आठ आगारांत सहायक वाहतूक अधीक्षकच नाही
महामंडळाच्या यवतमाळ विभागांतर्गत एकूण नऊ आगार आहेत. त्यातील वणी आगाराचा अपवाद वगळता आठही आगारांत सहायक वाहतूक अधीक्षक पदावर नेमणूकच करण्यात आलेली नाही. शिवाय, यवतमाळ आणि पुसद या दोन आगारांत मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सहायक वाहतूक निरीक्षक पद रिक्त आहे. शिवाय, या पदाचा अतिरिक्त कार्यभार कुणाकडेही सोपविण्यात आलेला नाही. चालक, वाहकांचा इतरत्र वापर पुसद आगारात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले जाते.
पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचाही तुटवडा
महामंडळाच्या काही विभागांमध्ये पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचीही वानवा आहे. यवतमाळ विभागात वाणिज्य आणि अपघात शाखेला तर गेल्या एक ते दीड वर्षापासून पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. प्रतिनियुक्ती देऊन हे काम भागवले जात आहे. मार्ग तपासणी पथकाबाबतही हीच परिस्थिती आहे. आठ ते नऊ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कारभार चालवला जात आहे. परिणामी, तिकीट चोरीचे प्रकारही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.