मारेगावला हवे एसटी बसस्थानक
By Admin | Updated: December 27, 2014 23:00 IST2014-12-27T23:00:57+5:302014-12-27T23:00:57+5:30
तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ असलेले व तालुक्याचे मुख्यालय असलेले मारेगाव अद्याप बसस्थानकाविना आहे. आणखी किती वर्षे मारेगावकरांना बसस्थानकाची प्रतीक्षा करावी लागेल,

मारेगावला हवे एसटी बसस्थानक
मारेगाव : तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ असलेले व तालुक्याचे मुख्यालय असलेले मारेगाव अद्याप बसस्थानकाविना आहे. आणखी किती वर्षे मारेगावकरांना बसस्थानकाची प्रतीक्षा करावी लागेल, असा संतप्त प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करीत आहे.
सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या राज्य मार्गावर मारेगाव शहर वसलेले आहे. या शहरात अद्याप बसस्थानक अथवा साधा प्रवासी निवारा नाही. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. मागील दोन दशकापासून असलेली बसस्थानकाची मागणी अजूपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे आणखी किती दिवस बसस्थानकासाठी प्रतीक्षा करायची, असा प्रश्न प्रवाशी करीत आहे. यवतमाळ-चंद्रपूर या राज्य मार्गावर वसलेले मारेगाव शहर तालुक्यातील १०९ गावांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे.
येथून सर्व भागात जायला बस मिळत असल्याने या ठिकाणी प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. यातच भर तालुक्यातील महत्वाची शासकीय कार्यालये शहरात आहेत. तालुक्यातील १०९ गावांतील शेकडो ग्रामस्थ दररोज शासकीय अथवा खासगी कामानिमित्त शहरात येतात. संपूर्ण तालुक्यात मारेगाव येथे एकमेव वरिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखा आहेत. वणीच्या महाविद्यायात प्रवेश न मिळालेले वणी-झरी तालुक्यातील विद्यार्थी तेथे प्रवेश घेतात. त्याचसोबत फॉर्मसी महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, सहा माध्यमिक विद्यालये, तीन कनिष्ठ विद्यालये असल्याने शेकडो विद्यार्थी दररोज येथे येतात.
शहरात शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. शहरात पाणी व खोल्या भाड्याने मिळत नसल्याने बहुतांश शासकीय कर्मचारी बाहेर गावावरून ये-जा करतात. मात्र त्यांच्यासह सामान्य जनतेलाही येथील बस थांबा परिसरात साधे उभे राहायलासुद्धा जागा मिळत नाही. या ठिकाणी असलेला प्रवासी निवारा दोन वर्षांपूर्वी रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली जमीनदोस्त केला गेला. दोन वर्षात रस्ता रूंदीकरण झाले नाही, मात्र प्रवासी निवारा जमीनदोस्त झाला. या परिसरातील मोकळ्या जागेवर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी प्रवाशांना उभे राहायलाही तेथे जागा नसते. प्रवासी तास न् तास झाडांच्या सावलीत दुकानाच्या आश्रयाने उभे असतात.
शहराच्या वाढत्या महत्त्वानुसार येथे कित्येक वर्षांपूर्वीच बसस्थानक होणे आवश्यक होते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही. आता राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असल्याने आणि खासदार व आमदारही त्याच पक्षाचे असल्याने त्यांनी लक्ष घालून मारेगाव शहरात बसस्थानकाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)