तीन आठवड्यांपासून एसटी बस जागेवरच; बॅटरी जाण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST2021-12-02T05:00:00+5:302021-12-02T05:00:31+5:30
यामध्ये प्रामुख्याने बॅटरी जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही यांत्रिक प्रश्नही उद्भवू शकतात. यावर मात करण्यासाठी कोरोनाकाळातील नियमाप्रमाणे दररोज एसटी अर्धा तास सुरू करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय बॅटरीचे केबल काढून ठेवण्याचेही आदेश आहेत. यामुळे बॅटरी वाचेल आणि कुठला बिघाडही हाेणार नाही. यादृष्टीने कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. मात्र, कर्मचारीच संपावर असल्याने एसटीची सुस्थिती कायम ठेवण्याचे आवाहन परिवहन महामंडळापुढे उभे आहे.

तीन आठवड्यांपासून एसटी बस जागेवरच; बॅटरी जाण्याची भीती
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : २६ दिवसांपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळेएसटीची चाके रूतली आहे. कुठलेही यंत्र सतत बंद राहिले तर त्याच्यावर परिणाम होतो. हा नियम आहे. या नियमानुसार एसटीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
यामध्ये प्रामुख्याने बॅटरी जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही यांत्रिक प्रश्नही उद्भवू शकतात. यावर मात करण्यासाठी कोरोनाकाळातील नियमाप्रमाणे दररोज एसटी अर्धा तास सुरू करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय बॅटरीचे केबल काढून ठेवण्याचेही आदेश आहेत. यामुळे बॅटरी वाचेल आणि कुठला बिघाडही हाेणार नाही. यादृष्टीने कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. मात्र, कर्मचारीच संपावर असल्याने एसटीची सुस्थिती कायम ठेवण्याचे आवाहन परिवहन महामंडळापुढे उभे आहे. या संपाने मेंटेनन्सचा खर्च वाढू शकतो. यातून विविध अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
बसेसच्या झाल्या केवळ सहा फेऱ्या
- जिल्ह्यातील यवतमाळ आगारातून चार बसफेऱ्या निघाल्या, तर वणी आगारातून दोन बस बाहेर पडल्या.
- आंदोलकांची वाढती दहशत पाहता कर्मचाऱ्यांनी वाहने रस्त्यावर काढण्यास आखडता हात घेतला.
- दोन दिवसात परिवहन महामंडळाला केवळ नऊ हजार रुपये हातात पडले आहे.
आतापर्यंत २९१ जणांवर झाली कारवाई
- राज्य परिवहन महामंडळाने २९१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. ही कारवाई निरंतर सुरू आहे.
- परिवहन महामंडळाने १०४ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे सेवासमाप्तीचे आदेश काढले आहेत.
- एकीकडे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे कारवाईचा बडगा सुरू आहे.
केवळ १६० कर्मचारी कामावर
- जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये, आस्थापनांमध्ये काम करणारे १६० कर्मचारी कामावर आले आहेत.
- यामध्ये चालक, वाहकांची संख्या फारच कमी आहे. यामुळे वाहनांना चालू-बंद करताना विविध अडचणी येत आहेत.
मेंटेनन्सवर होणार लाखोंचा खर्च
- लाॅकडाऊन काळात परिवहन महामंडळाने ज्या पद्धतीने एसटी बसची काळजी घेतली त्याचप्रमाणे संपकाळातही ही खबरदारी घेण्याच्या सूचना आहे.
- बॅटरी चालू-बंद करणे, बॅटरीचा करंट काढून ठेवणे, अशा प्रकारची कामे मर्यादित कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर पार पाडली जात आहेत.