एसटी बस नाल्यात काेसळली; एक ठार, ११ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 21:24 IST2022-03-31T21:18:54+5:302022-03-31T21:24:11+5:30
Yawatmal News मजूर घेऊन जात असलेल्या वाहनाला एसटी बसची धडक लागून झालेल्या अपघातात एकजण ठार तर अकराजण जखमी झाले आहेत.

एसटी बस नाल्यात काेसळली; एक ठार, ११ जखमी
यवतमाळ : अमरावतीवरून येणाऱ्या बसची मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाला धडक बसली. रस्त्यावरील वळणावर गुरुवारी रात्री ७ वाजता हा अपघात झाला. अनियंत्रित झालेली बस नाल्यात कोसळली. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. सात जण जखमी झाले आहेत. हे सर्व मजूर सोनवाढोणा येथील असून स्लॅबचे काम आटोपून घराकडे परत जात होते.
पिंटू सुखराज जाधव (३५) असे मृताचे नाव आहे. श्रीराम डोमाजी पवार (३६), आनंद धनराज आडे (४०), धर्मराज उद्धव आडे (सर्व रा. सोनवाढोणा) हे गंभीर जखमी आहेत. आकाश मोहन जाधव (२५), पंकज विजय पवार (२२), दिनेश सीताराम पवार (३८), नारायण सहदेव चव्हाण (२७), युवराज वसंत राठोड (३०), गुरूदास दुलसिंग आडे (३५), वामन शामराव पवार (४०) हे जखमी झाले आहेत. हे सर्व सोनवाढोणा येथे राहणारे मजूर असून यवतमाळात स्लॅबच्या कामावर आले होते.
गुरुवारी आपले काम आटोपून एम.एच.३६/एफ.२३५१ या वाहनाने गावाकडे परत जात होते. या वाहनाला त्यांनी काँक्रीट मिक्सर मशीन जोडली होती. शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ अमरावतीवरून यवतमाळकडे येणाऱ्या एसटी बसला समोरासमोर धडक बसली. या धडकेनंतर वाहनातील मजूर मिक्सर मशीनवर फेकले गेले तर एसटी बसचालक राजेश श्रीराम जाधव (४५) यांचे नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात कोसळली. एसटी बसमध्ये मोजकेच प्रवासी असल्याने हानी झाली नाही. मात्र, राजेश जाधव जखमी झाले. बोलेरो वाहनाने जाणारे मजूर गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बराचवेळ अमरावती मार्गाची वाहतूक ठप्प झाली होती. आणखी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. लोहारा पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.