वाघांच्या बंदोबस्तानंतरच पथक परतणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:51 IST2017-09-25T00:50:35+5:302017-09-25T00:51:10+5:30
वाघाने सात जणांचा बळी घेतल्याने राळेगावसह तीन तालुक्यातील नागरिक कमालीचे दहशतीखाली आहे. या परिसरातील वन्यप्राणीग्रस्तांची बैठक सखी (ता.राळेगाव) येथे घेण्यात आली.

वाघांच्या बंदोबस्तानंतरच पथक परतणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाघाने सात जणांचा बळी घेतल्याने राळेगावसह तीन तालुक्यातील नागरिक कमालीचे दहशतीखाली आहे. या परिसरातील वन्यप्राणीग्रस्तांची बैठक सखी (ता.राळेगाव) येथे घेण्यात आली. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या बैठकीला मार्गदर्शन करताना नागरिकांना दिलासा दिला. वन्यप्राण्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे तिवारी यांनी यावेळी सांगितले.
वाघाला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. संपूर्ण परिसर वाघमुक्त केल्याशिवाय ही मोहीम थांबणार नाही, असे ते म्हणाले. आमदार डॉ.अशोक उईके यांनी हा गंभीर प्रश्न सरकार दरबारी लावून धरला आहे. सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सखी येथील -- कोवे याला वाघाने ठार मारले. त्याच्या कुटुंबाला वन विकास महामंडळाकडून आठ लाखांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. तशी माहिती पांडुरंग कोवे यांनी यावेळी दिली.
सखी परिसरातील नागरिक वाघाच्या दहशतीखाली आहे. शेतकरी, शेतमजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि शोधमोहिमेचा आढावा घेण्यासाठी किशोर तिवारी यांनी सखी येथे भेट दिली. यावेळी अशोक केवटे, विजय तेलंगे, मानद वन्यजीव रक्षक डॉ.आर.एन. विराणी, उपवनसंरक्षक के.एम. अभर्णा, एफडीसीएमचे व्यवस्थापक पुनसे, जानराव ठाकरे, भोनूजी टेकाम, अंकित नैताम, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, आरोग्य अधिकारी डॉ.पवार, गटविकास अधिकारी खेडकर आदी उपस्थित होते.
समस्यांचे निराकरण करण्यासाठीच्या चर्चेत रघुनाथ मेश्राम, गजानन ढाले, दत्ता देशमुख, रामरावजी पुरके, अनिल सुरपाम आदी सहभागी झाले होते. वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे अनेकजण वाघाचे बळी ठरत असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. सदर प्रकरणी जबाबदार अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे किशोर तिवारी यांनी यावेळी सांगितले.