गावागावातील तरुणांना बनविणार ‘स्पेशल पोलीस ऑफीसर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:20+5:30

यवतमाळ जिल्ह्यात मार्चच्या प्रारंभापासूनच कोरोनाचे रुग्ण आढळणे सुरू झाले. साधारण १५ मार्चपासूनच जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये ‘अघोषित बंदी’ सुरू झाली. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर तर लॉकडाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणीच सुरू झाली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा पोलीस दलातील संपूर्ण मनुष्यबळ कोरोना बंदोबस्तातच दिवसरात्र व्यस्त आहे.

'Special police officers' to be formed for rural youth | गावागावातील तरुणांना बनविणार ‘स्पेशल पोलीस ऑफीसर’

गावागावातील तरुणांना बनविणार ‘स्पेशल पोलीस ऑफीसर’

ठळक मुद्देएसपींची योजना । पोलिसांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सुमारे दोन महिन्यांंपासून कोरोनामुळे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करताना पोलीस दलावर प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी आता गावागावातील तरुणांना ‘स्पेशल पोलीस ऑफीसर’ म्हणून नेमण्याचा निर्णय जिल्हा पोलीस दलाने घेतला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ पोलिसांनी सुरू केलेला हा उपक्रम राज्यात एकमेव ठरला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मार्चच्या प्रारंभापासूनच कोरोनाचे रुग्ण आढळणे सुरू झाले. साधारण १५ मार्चपासूनच जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये ‘अघोषित बंदी’ सुरू झाली. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर तर लॉकडाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणीच सुरू झाली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा पोलीस दलातील संपूर्ण मनुष्यबळ कोरोना बंदोबस्तातच दिवसरात्र व्यस्त आहे. शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा अटकाव कायम ठेवण्यासाठी पोलिसांना आरोग्य यंत्रणेएवढेच झटावे लागत आहे. आता तर जिल्ह्याचा विस्तार बघता पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडू लागले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त लावताना स्थानिक तरुणांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी घेतला आहे. अशा इच्छुक तरुणांकडून अर्ज मागण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व २९ पोलीस ठाण्यांना त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील तरुणांची यादी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. या तरुणांना ‘स्पेशल पोलीस ऑफीसर’ म्हणून नेमणूक दिली जाणार आहे.

कुणा कुणाला संधी
कोरोना बंदोबस्तात ‘स्पेशल पोलीस ऑफीसर’ होण्याची संधी तरुणांना दिली जाणार आहे. त्यासोबतच एनसीसीचे विद्यार्थी, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, सेवानिवृत्त सैनिक, पोलीस मित्र, पोलीस भरतीसाठी तयारी करीत असलेले उमेदवार आदींचीही यात वर्णी लागणार आहे. मात्र निवड करताना उमेदवार ५० वर्षावरील नसावा, त्याच्या संपर्कातील कोणत्याही व्यक्तीला क्वारंटाईन केलेले नसावे, संबंधित उमेदवार कोविड संवेदनशील भागातील रहिवासी नसावा, अलिकडच्या काळात तो पुणे-मुंबई किंवा कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणावरून आलेला नसावा याची दक्षता घेतली जाणार आहे.

Web Title: 'Special police officers' to be formed for rural youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस