एसपींनी पुन्हा काढला अवैध धंदे बंदचा फतवा
By Admin | Updated: December 23, 2014 23:11 IST2014-12-23T23:11:55+5:302014-12-23T23:11:55+5:30
पोलिसांच्या आशीर्वाद लाभलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षकांनाच पुन्हा फतवा काढावा लागला. त्यासाठी वरिष्ठांना बाजुला ठेवून कनिष्ठांना कारवाईचे आदेश दिले.

एसपींनी पुन्हा काढला अवैध धंदे बंदचा फतवा
सतीश येटरे - यवतमाळ
पोलिसांच्या आशीर्वाद लाभलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षकांनाच पुन्हा फतवा काढावा लागला. त्यासाठी वरिष्ठांना बाजुला ठेवून कनिष्ठांना कारवाईचे आदेश दिले.
यवतमाळ, दारव्हा, पुसद, वणी, पांढरकवडा या पाचही उपविभागात अवैध धंदे जोरात सुरू आहे. त्यामध्ये हप्तेखोरीची सर्वाधिक उलाढाल यवतमाळ उपविभागात आहे.त्याच्या वसूलीसाठी खास माणसेही नेमण्यात आली. त्याच्या गोपनीय माहितीवरून धंद्यावर धाड घालायची, त्यात मलिदा लाटायचा, नंतर धंदा पुढे सुरू ठेवण्यासाठी डिल करायची, अशी पध्दत आहे. याची दखल घेत दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी अवैध धंदे बंद करण्याचा पुन्हा फतवा काढला. मात्र खुलेआम नको पण छुप्या मार्गाने धंदे सुरू ठेवले तर चालतील, असा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे एसपींचा हा फतवा पुन्हा प्रभावहीन होण्याचीच शक्यता आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर अवैध धंदे नियंत्रणात होते. मात्र आता तर चक्क निमंत्रित करून अवैध धंद्यांची बोलणी केली जाते. एकदा व्यवहार ठरताच धंद्याची ‘एनओसी’ दिली जाते. यातील पोलीस शिपायावर यापूर्वी दोनदा एसीबीचा ट्रॅप फसला. त्या भीतीने तो दीर्घ रजेवर गेला. आता पुन्हा रुजू होताच त्याने दुसऱ्याच्या नावे सीम घेऊन वसुलीचा सपाटा चालविला. त्याला कॉल डिटेल्सचीही भीती नाही. या शिपायाचे आणि त्याच्या साहेबांचे कारनामे एसपींच्या ‘गुडबुक’मधील एका पोलीस निरीक्षकाने त्यांच्या कानापर्यंत पोहचविल्याने बरेच ‘वांदे’ झाले. अलकिडेच एका जुगारावर धाड घालून दोन लाख ८० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र रेकार्डवर त्यातील केवळ २७ हजार दाखविण्यात आले. याव्यतिरिक्त जुगार अड्ड्याच्या खऱ्या मालकाला आरोपी करू नये आणि जुगाऱ्यांना तत्काळ जामीन देण्यासाठी आणखी एक लाख रुपये घेण्यात आले. त्यांचे असे अनेक कारनामे पोलिसात चर्चीले जात आहेत.