अन् वाघ आडवा येताच, दुचाकी टाकून युवक चढले झाडावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 20:20 IST2021-01-15T20:19:15+5:302021-01-15T20:20:15+5:30
Yavatmal News : घरगुती सामान घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारांना दोन वाघ रस्त्यावर आडवे झाल्याने दुचाकी बाजूला टाकून झाडावर चढले. त्यामुळे या दोघांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.

अन् वाघ आडवा येताच, दुचाकी टाकून युवक चढले झाडावर
यवतमाळ - सायंकाळी घरगुती सामान घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारांना दोन वाघ रस्त्यावर आडवे झाल्याने दुचाकी बाजूला टाकून झाडावर चढले. त्यामुळे या दोघांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.
गुरुवारी पाटणबोरी येथून सायंकाळी ५ वाजता महेश संजय मोहुर्ले व नीतेश दादाराव शेंडे हे दोघे घरगुती सामान घेऊन पारंबा कारेगाव या आपल्या गावी जात होते. दरम्यान, बेलमपेल्ली या गावासमोर जंगलाच्या भागात रस्त्यावर दोन वाघ अचानक आडवे झाले. समोरासमोर दोन वाघ दिसताच, या दोघांचीही घाबरगुंडी उडाली. त्यांना काय करावे व काय नाही, काहीच सुचले नाही. दोन्हीही वाघ त्यांच्याच दिशेने येत असल्याने दोघांनी दुचाकी बाजूला टाकली आणि शेजारील झाडावर ते चढले. झाडावर चढल्यानंतर दोन्ही वाघ झाडाखाली आले व डरकाळी फोडली. दोघांनी मोबाईलवरून गावकऱ्यांना माहिती दिली. काही काळ थांबल्यानंतर दोनपैकी एक वाघ निघून गेला. मात्र एक वाघ झाडाखालीच बसून राहिला. काही वेळाने गावकरी हातात काठ्या घेऊन घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वाघाला हाकलून लावले. त्यनंतर दोघांनाही झाडावरून खाली उतरविण्यात आले.