शिपाई आईने घडविला पोलीस उपअधीक्षक

By Admin | Updated: April 7, 2016 02:28 IST2016-04-07T02:28:11+5:302016-04-07T02:28:11+5:30

शासकीय कार्यालयात शिपाई असलेल्या आईने मुलाला ‘साहेब’ करण्याचे स्वप्न पाहिले. मुलानेही मेहनत सुरू केली.

The soldier's mother made the Deputy Superintendent of Police | शिपाई आईने घडविला पोलीस उपअधीक्षक

शिपाई आईने घडविला पोलीस उपअधीक्षक

जगदीश पांडेच्या संघर्षाची यशोगाथा : नववीत वरपास, पॉलिटेक्निकला नापास मात्र जिद्दीतून मिळविले यश
अविनाश साबापुरे यवतमाळ
शासकीय कार्यालयात शिपाई असलेल्या आईने मुलाला ‘साहेब’ करण्याचे स्वप्न पाहिले. मुलानेही मेहनत सुरू केली. एका खासगी कंपनीत नोकरी केली. मग विस्तार अधिकारी झाला. लगेच विक्रीकर निरीक्षकही झाला. पण तेवढ्यावरच न थांबता विक्रीकर आयुक्त झाला. अन् आता तर तो थेट पोलीस उपअधीक्षक बनलाय... ही चित्रपटाची कहाणी नव्हे; ही संघर्षातून घडलेली यशोगाथा आपल्याच यवतमाळातील तरुणाची आहे. जगदीश पंचफुला रामराव पांडे हे त्यांचे नाव!
पोलीस उपअधीक्षक झालेला हा यवतमाळातील पहिलाच तरुण. मंगळवारी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि तुळजानगरीतील ‘प्लॉट नं २५’ मधील घर आनंदाने गहिवरून गेले. या घरात राहणारे जगदीश पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) झाले.
महागाव तालुक्यातील मुडाणा हे जगदीश यांचे मूळगाव. जगदीश लहान असतानाच वडील रामराव यांचे निधन झाले. आई पंचफुला यांच्यावर जबाबदारी आली. त्यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंतच. बऱ्याच धडपडीनंतर त्यांना आदिवासी विकास महामंडळाच्या यवतमाळ कार्यालयात शिपायी म्हणून काम मिळाले. दोन मुले, एक मुलगी घेऊन त्या एका छोट्याशा खोलीत राहायच्या. जगदीशचे लक्ष अभ्यासापेक्षा खेळाकडे अधिक. नगरपालिकेच्या १६ क्रमांकाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. नंतर लोकनायक बापूजी अणे विद्यालयात शिकताना तो अक्षरश: वरपास झाला. गणित जगदीशसाठी कठीण विषय बनला होता. हा काही शिकत नाही म्हणून आईने शेवटी जगदीशला मुडाणाच्या निजधाम आश्रम विद्यालयात शिकायला पाठविले. तेथे चव्हाण, खंदारे, शिरजाबादकर या शिक्षकांनी जगदीशवर विशेष लक्ष केंद्रित करून त्याला दहावी पार केले. नंतर वाशीम येथे पॉलिटेक्निकसाठी पाठविले. पण तिथेही अनुत्तीर्ण झाला होता. नंतर तंत्रनिकेतनचा पल्लाही यशस्वी केला. जगदीशला कंपनीत जॉब मिळाला. नोकरी करतच जगदीशने पदवीचे शिक्षण घेतले. ही बीएची पदवी घेतना दाते महाविद्यालयातील प्रा. विवेक देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवून जगदीशने स्पर्धा परीक्षेची तयारी केली अन् २००६ मध्ये ते यवतमाळ पंचायत समितीमध्येच विस्तार अधिकारी झाले. अवघ्या दोनच वर्षात २००८ मध्ये विक्रीकर निरीक्षक पदावर त्यांची निवड झाली. परंतु अवघ्या तीन महिन्यात राजीनामा देऊन यवतमाळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू केले. त्यातच २०१३ मध्ये ते वाशीम येथे सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून रूजू झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अवघ्या तीन वर्षात आता ते पोलीस उपअधीक्षक म्हणून रूजू होणार आहेत.

सात हजार विद्यार्थी घडविले
स्पर्धा परीक्षेसाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या जगदीश पांडे यांनी २००८ मध्ये करिअर अकादमी सुरू केली. त्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील जवळपास सात हजार विद्यार्थी घडविले. ‘‘त्यावेळी एमपीएससीचा सिलॅबस बदलला होता. त्यामुळे शिकवण्यासाठी मलाच खूप पुस्तकांचा संदर्भ घ्यावा लागला. विद्यार्थ्यांना शिकवता-शिकवता माझाही खोलवर अभ्यास झाला. त्यामुळे माझे विद्यार्थीच माझ्यासाठी प्रेरणा ठरले आहेत.’’, असे जगदीश पांडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. यवतमाळातील समर्थवाडी परिसरात त्यांची ही अभ्यासिका आजही शेकडो विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात पांडे सरांनी घडविलेला एक तरी अधिकारी सापडतोच, अशी माहिती जगदीश यांचे मोठे बंधू प्रभाकर पांडे यांनी दिली.

Web Title: The soldier's mother made the Deputy Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.