कळंबमध्ये माती परीक्षणाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:03 IST2017-09-01T22:03:17+5:302017-09-01T22:03:38+5:30
आपल्या शेत जमिनीचा पोत काय, उपलब्ध पाण्यातील क्षारांचे प्रमाण किती व त्यानुसार कोणते पीक घेणे फायदेशिर आहे, ...

कळंबमध्ये माती परीक्षणाचा फज्जा
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : आपल्या शेत जमिनीचा पोत काय, उपलब्ध पाण्यातील क्षारांचे प्रमाण किती व त्यानुसार कोणते पीक घेणे फायदेशिर आहे, याची माहिती शेतकºयांना करून देण्याचा कार्यक्रम कृषि विभागाने तिन वर्षांपूर्वी अंमलात आणला होता़ परंतु या सुपिकता निर्देशांकाचा कळंब तालुक्यात पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येते. कृषी विभागाकडून तपासणीच होत नसल्याची शेतकºयांची ओरड आहे.
जमिनीचा सुपिकता निर्देशांक शेतकºयांना माहीत करून देण्यासाठी कृषी विभागाच्या वरिष्ठ पातळीवरुन एका कंपनीशी करार करण्यात आला होता. या माध्यमातून शेतकºयांना उत्पादन वाढीस चांगला फायदा मिळणार असल्याचा दावा कृषि विभागातर्फे करण्यात आला होता. परंतु बहुतांश शेतकºयांच्या जमिनीचा पोतच तपासला न गेल्याने हा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे.
बहुतांश वेळा शेतकºयांना स्वत:च्या जमिनीची क्षमता, पोत व गुणवत्ता माहीत नसते़ त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये कोणते पीक घेणे फायदेशीर ठरते, या पासुनही शेतकरी अनभिज्ञ असतात़ याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होतो़ परिणामी उत्पादनासाठी लागलेला खर्चही वर्षाच्या शेवटी निघत नाही, अशी शेतकºयांची दरवर्षीची ओरड असते़ त्यामुळे शेतकरी शेवटी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेतात़ यापासून शेतकºयांची सुटका व्हावी किंबहुना काही प्रमाणात दिलासा मिळावा, या हेतुने शासनाने प्रत्येक गावातील जमिनीची पोत व त्यानुसार घ्यावयाच्या पीकांची व त्या अनुंषगाने द्यावयाच्या खत मात्रांची माहिती करुन देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता.प्रत्येक गावातील मातीचे साधारणत: तीस नमुने घेणे़ त्यानुसार ज्वारी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, गहू, हरबरा, कापूस, मिर्ची, संत्रा, मोसंबी यातील कोणत्या पीकांसाठी संबधित गावातील जमीन फायदेशिर ठरू शकते, याचे परीक्षण करणे़, सोबतच पाणी व पानांचाही निर्देशांक काढणे. फलकाच्या माध्यमातून संबधित गावामध्ये कोणते पीक घेणे फायदेशिर आहे़ काय मात्रा द्यावी, याची माहीती देण्यात येणार होती़ परंतु बहुतांश गावामध्ये असे फलकच दिसून येत नाही, ही वास्तविकता आहे. काही गावांमध्ये जमीनीच्या सुपिकता निर्देशांकांची माहिती गावातील दर्शनी ठिकाणी फलकाच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. तालुक्यात लाखो शेतकरी असताना केवळ चार ते साडेचार हजार शेतकºयांच्या शेतीचे परीक्षण केल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे. परंतु याचा किती शेतकºयांना काय फायदा झाला, याचे कुणाजवळी उत्तर नाही.