So far, Rs 363 crore has been spent on the water-based campaign | जलयुक्त अभियानावर आतापर्यंत खर्च झाले 363 कोटी रुपये

जलयुक्त अभियानावर आतापर्यंत खर्च झाले 363 कोटी रुपये

ठळक मुद्देकामकाजातील गैरप्रकाराची चौकशी होणार : अनेक गावात टंचाई

    लाेकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गावातील पाणी गावातच मुरवून सिंचन समृद्धी साधण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला. हा प्रयोग काही गावांमध्ये यशस्वी झाला. तर काही ठिकाणी अयशस्वी झाला. काही भागात कामकाज पाहिजे तसे झालेच नाही. आता या संपूर्ण कामकाजाची चौकशी होणार आहे. 
जिल्ह्यात आतापर्यंत १३३७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचे काम हाती घेण्यात आले. १३३७ गावांमध्ये हाती घेतलेले संपूर्ण काम पूर्ण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. या कामांवर आतापर्यंत ३६३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सिंचन समृद्धीमुळे काही गावांमध्ये सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. तर काही गावांमध्ये अजूनही पाण्याचा प्रश्न तसाच आहे. सिंचन विहिरी तर सोडाच गावातील पेयजलाच्या विहिरीचाही पाणीसाठा वाढला नाही. गावकऱ्यांनी योजनेत सुधारणा करण्याची मागणी केली. 

मारेगाव
मारेगाव तालुक्यातील बोटाेणी गावामध्ये जलयुक्त शिवार योजनेतून नाला खोलीकरणाचे व बंधाऱ्याचे काम करण्यात आले. परंतु हे काम फारच तोकडे असून याचा उपयोग फक्त काही शेतकऱ्यांपुरताच मर्यादित राहिला आहे. नाला खोलीकरणाचे काम जास्त प्रमाणात केल्यास सिंचन क्षेत्रात आणखी वाढ होऊ शकते. 
- रामदास लालसरे, बोटोणी

आमच्या गावात कायमस्वरूपी पाणीटंचाई असते. यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून हा प्रश्न मिटेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्याच्या उलटे झाले. योजना राबविल्या गेली, पाणीटंचाई सुटली नाही.      - नीळकंठ बोरकर, सरपंच इचोरी

गावामध्ये दोन सिमेंट प्लग बंधारे बांधण्यात आले. त्या ठिकाणी पाणी थांबेल आणि भूजल पातळी वाढेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात या बंधाऱ्यात पाणीच राहत नाही. 
 - पुरुषोत्तम राठोड, गावकरी

नांदेपेरा 
बावणमोडी नाल्याचे खोलीकरण झाल्यामुळे उन्हाळ्यात कोरडा पडणारा नाला नेहमी वाहता झाला आहे. गावातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यात मदत झाली आहे. यातून सिंचन वाढले आहे. तर गावातील पाणी पातळी वाढल्याने उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारण्यास मदत झाली आहे.        - विलास चिकटे, नांदेपेरा 

सन २०१७-१८ मध्ये आमच्या गावात नाला सरळीकरण करण्यात आले. शेतात बांध बंदिस्ती करण्यात आली. मात्र याचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. 
 - संदेश राठोड, सरपंच, गहुली हेटी

योजनेमध्ये नाला साफ झाल्याने पुराचा धोका कमी झाला. मात्र पश्चीम महाराष्ट्राप्रमाणे शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोग होत नाही. 
 - दिलीप खडसे, सोनावाढोणा 

महागाव
महागाव तालुक्यातील दगडथर हे गाव जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवडण्यात आले होते. यंत्रणाही तयार होती. मात्र गावात कामाला सुरुवातच झाली नाही. यामुळे गावातील सिंचन वृद्धीचे स्वप्न सध्या अपूर्ण आहे. प्रशासनाने कामकाजाला प्रारंभ केला तर गावाचे चित्र पालटेल. 
-दिलीप इंगोले, दगडथर,माजी सरपंच 

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाला ठिकठिकाणी अडविला गेला. यामुळे नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण झाले. यातून सिंचन वाढले आहे. 
 -गजानन आत्राम, सरपंच किटाकापरा

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली.  
 - राकेश खामकर, ग्रा.पं. सदस्य

Web Title: So far, Rs 363 crore has been spent on the water-based campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.