महा-ई-सेवा केंद्रात लूट

By Admin | Updated: June 5, 2017 01:23 IST2017-06-05T01:23:00+5:302017-06-05T01:23:00+5:30

नागरिकांना विनकटकट शासकीय दाखले उपलब्ध करण्यासाठी गावागावांत महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

Smash in the Maha-e-Seva Kendra | महा-ई-सेवा केंद्रात लूट

महा-ई-सेवा केंद्रात लूट

दर फलकाचा अभाव : दाखल्यासाठी झिजवावे लागतात उंबरठे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : नागरिकांना विनकटकट शासकीय दाखले उपलब्ध करण्यासाठी गावागावांत महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. परंतु येथे दाखले देण्यासाठी तिप्पट ते चौपट दर आकरले जात असून त्यातून नागरिकांची लूट केली जात आहे. सेवेपेक्षा मेवा मिळविण्याचा उद्देश असल्याने एका दाखल्यासाठी सेवा केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत आहे. तसेच दर फलकाचा अभाव असल्याने येथे दुप्पट, तिप्पट दर आकरले जात आहे.
सध्या अकरावी तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, जातीचा दाखला आदी दाखले काढण्यासाठी गर्दी होत आहे. परंतु याच संधीचे सोने करण्यासाठी बहुतांशी महा-ई-सेवा केंद्र चालकांनी आकडे ही वाढविले आहेत. महा-ई-सेवा केंद्रामधून उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, सातबारा, आठ अ, रेशनकार्ड दुरुस्ती, नावे कमी-जास्त करणे, दुबार रेशनकार्ड काढणे, अथवा विभक्त करणे, जन्म-मृत्यूचा दाखला, ऐपतदारी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक दाखला आदीसह १७ प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. याशिवाय भू-अर्जन विभागातील फेरफार, नमुना फॉर्म भरणे ही कामे केली जातात. परंतु या दाखल्यांसाठीही ग्रामीण भागातील लोकांची लूट केलीच जात आहे. उत्पन्नाचा दाखला, डोमीसाईल देण्यासाठी नियमाप्रमाणे ५४ रुपये घेणे बंधनकारक असतानाही १२० ते १५० रुपयाहून जास्त पैसे उकळले जात आहेत. बहुतांशी महा-ई-सेवा केंद्रामध्ये दरफलक लावले जात नसल्याने अव्वाच्या सव्वा रक्कम उखळली जात आहेत. शिवाय ते दाखले लवकर मिळवून देतो असे सांगून त्यासाठी दररोज अधिकाऱ्यांपर्यंत खेटे घालण्याचेही उद्योगही काही केंद्रचालकांनी सुरू केले आहेत.
महा-ई-सेवा केंद्रांना स्पॅन्को कंपनीतर्फे ग्रामीण भागात केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली जाते. परंतु काही केंद्रचालक राजकीय ताकदीचा वापर करून ग्रामीण भागातील परवानगी असतानाही तालुक्याच्या ठिकाणी दुकान मांडत आहेत. तहसील कार्यालयाजवळ बसणाऱ्या एजंटला आळा बसावा म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी केली. यावर आॅनलाईन अर्ज भरण्याची देखील सोय आहे. गोरगरीब नागरिकांना या सेवेचा प्रत्येकाच्या घराजवळ ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या या सेवेसाठी दरपत्रक का असू नये तसेच अर्ज भरल्यानंतर पावतीही दिली जात नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने कारवाई करून पिळवणूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून आहे.

शासकीय दरापेक्षा अधिक रकमेची मागणी
महा-ई-सेवा केंद्रात लूट होत असल्यास नागरिकांनी तक्रार करावी. या तक्रारीवरून चौकशी करून संबंधिताचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच सर्व केंद्रचालकांना दरपत्रक लावण्याची सूचना दिली जाईल. यासंदर्भात लवकरच एक बैठक घेणार आहो.
- डॉ.संजय गरकल
तहसीलदार, पुसद

शासकीय दरापेक्षा अधिकची रकमेची आकारणी केली जाते. अर्जंट दाखला पाहिजे असे सांगितले तर यांचा दर कैकपटीने वाढते. केंद्राची नियमित तपासणी झाली पाहिजे. शहरातील महा-ई-सेवा केंद्रात सर्रासपणे ग्राहकांची लूट सुरू आहे.
- मीरादेवी अग्रवाल, पुसद

केंद्रचालकांना नागरी सुविधेसाठीचे कडक नियम लागू करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा ही केंद्रे बंद असतात. महा-ई-सेवा केंद्रचालकावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे त्यांची मनमानी कारभार सुरू आहे. अधिकचे शुल्क आकारून नागरिकांची लूट केली जाते.
- सुधाकर चापके, पुसद

Web Title: Smash in the Maha-e-Seva Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.