कातडे झाडावरून तर शीर दरीतून जप्त
By Admin | Updated: October 28, 2014 23:03 IST2014-10-28T23:03:28+5:302014-10-28T23:03:28+5:30
शेळ्या मारल्याने बिबट्यावर विष प्रयोग करणाऱ्या पितापुत्रांच्या अटकेनंतर वन विभागाने बिबट्याची कातडी आणि शिर जप्त केले आहे. शेंबाळपिंपरी वन परिक्षेत्रातील सावरगाव बंगला जंगलामध्ये

कातडे झाडावरून तर शीर दरीतून जप्त
बिबट्याचे प्रकरण : पितापुत्राची कबुली
पुसद/शेंबाळपिंपरी : शेळ्या मारल्याने बिबट्यावर विष प्रयोग करणाऱ्या पितापुत्रांच्या अटकेनंतर वन विभागाने बिबट्याची कातडी आणि शिर जप्त केले आहे. शेंबाळपिंपरी वन परिक्षेत्रातील सावरगाव बंगला जंगलामध्ये बिबट्यावर विष प्रयोग करून त्याला ठार मारण्याचा प्रकार उघडकीस आला होता.
पुसद तालुक्यातील सावरगाव बंगला जंगलात चामडे सोललेल्या अवस्थेत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी वन विभागाने तपास केला असता शेकोराव नारायण इंगळे (६५) आणि गणपत शेकोराव इंगळे रा.लोणदरी या पितापुत्रांनी बिबट्यावर विष प्रयोग केल्याचे पुढे आले होते. वन विभागाने या दोघांनाही अटक करून त्यांची वन कोठडी मिळविली होती. इंगळे यांच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्याने बिबट्यावर विष प्रयोग केला होता. तसेच हा प्रकार दडपण्यासाठी चामडी सोलून त्याचे शिरही बेपत्ता केले होते. वन विभागाने मिळविलेल्या कोठडीत या दोघांनी बिबट्याला मारल्याची कबुली दिली. मंगळवारी वनविभागाच्या पथकाने २० किमीची पायपिट केल्यानंतर इंगळे यांच्या शेतातीलच एका मोठ्या झाडावर बिबट्याचे कातडे आढळून आले. तसेच सोमवारी बिबट्याचे शिर लोणदरी जंगलातील एका दरीत आढळून आले होते. या प्रकरणाचा तपास सखोल करण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात येणार आहे. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी शकील अहेमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक जावेद बेग, एम.एस. राठोड, एस.डी.चिलकर, वनरक्षक एम.जी. जानकर, आर.आर. राठोड, एम.डी. हगवणे, जे.एस. कऱ्हाळे, कु.के.डी. राठोड, एस.एस. उद्रके, वनमजुर गौतम कांबळे, तुकाराम जोगदंडे तपास करीत आहेत. (वार्ताहर)