सहा पाझर तलाव अडकले भूसंपादनात
By Admin | Updated: February 26, 2016 02:22 IST2016-02-26T02:22:43+5:302016-02-26T02:22:43+5:30
तालुक्यातील सहा गावच्या पाझर तलावाचे काम रखडले आहे. तलावासाठी लागणारी जमीन त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे.

सहा पाझर तलाव अडकले भूसंपादनात
महागाव : तालुक्यातील सहा गावच्या पाझर तलावाचे काम रखडले आहे. तलावासाठी लागणारी जमीन त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. भूसंपादनाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्यामुळे सिंचनाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कातरवाडी, नांदगव्हाण, वरोडी, बिजोरा, धारमोहा आणि वनोली गावचे भूसंपादन प्रस्ताव रखडले आहेत.
कातरवाडी पाझर तलावासाठी कार्यारंभ आदेश असून, संयुक्त मोजणीची प्रक्रिया पार पडलेली आहे. केवळ भूसंपादनाचे काम बाकी असल्यामुळे कातरवाडी येथील शेतकऱ्यांना मिळणारा लाभ थांबला आहे. भूसंपादनाची कारवाई तातडीने हाती घेतल्यास पाझर तलाव निर्माणानंतर शेतकऱ्यांना फायदा होईल. नांदगव्हाण पाझर तलावासाठी कार्यारंभ आदेश असून, संयुक्त मोजणीत शेतकऱ्यांना ६६ कायम नसल्यामुळे येथील मोजणी प्रक्रियाच थांबली आहे. नांदगव्हाण हा भाग खडकाळ असून, कायम पाणीटंचाईचे गाव म्हणून नांदगव्हाणची नोंद आहे. येथील पाणीटंचाईवर रामबाण उपाय म्हणून पाझर तलाव पर्याय असून, मुळात संयुक्त सर्वेमध्येच हा पाझर तलाव अडकला आहे. या तलावासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक आमदारांनी लक्ष घातल्यास ते सहज मार्गी लागण्यासारखे आहे. वरोडी पाझर तलावाचे कार्यारंभ आदेश आहेत. परंतु भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप हाती घेण्यात आली नाही. संयुक्त मोजणी पार पडली आहे. हा पाझर तलाव मार्गी लागल्यास पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. भूसंपादन झालेले नसल्यामुळे काम खोळंबले आहे. बिजोरा पाझर तलावाच्या भूसंपादनाचे अद्याप प्रस्तावच तयार करण्यात आलेले नाही. तीच गत धारमोहा पाझर तलावाची आहे. या दोन्ही पाझर तलावाचे भूसंपादन अहवालच तयार नाही. वनोली पाझर तलाव भूसंपादन प्रस्ताव तयार करण्यातच अडकला आहे. काहींचे भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करणे सुरू आहे. तर काहींची मोजणी प्रक्रिया थांबली आहे.
भूसंपादन प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पाझर तलाव निर्माणाचे कार्य ठरल्या वेळी होणे दिसत नाही. प्रस्तावित पाझर तलावाची सहाही गावे कमी अधिक प्रमाणात तीव्र पाणीटंचाईची आहेत. संबंधित गावच्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक आमदारांनी भूसंपादनाच्या कार्यवाहीला पुढे चालना जर दिली तर या पावसाळ्यापूर्वी पाझर तलाव पूर्ण होण्यास मदतच होणार आहे. सेनंद, बेलदरी आदी ठिकाणी असलेले पाझर तलाव बऱ्याच अंशी पाणी टंचाईवर मात करीत आहे. प्रस्तावित असलेल्या पाझर तलावामुळे पाणीटंचाई तर दूर होण्यास मदत होणार असून, जनावरांना पाण्याची सुविधा होणार आहे. (शहर प्रतिनिधी)