सहा लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 15:36 IST2020-11-03T15:35:55+5:302020-11-03T15:36:28+5:30
Yawatmal News farmer दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु हा मुहूर्त टळला. आता किमान दिवाळीपूर्वी तरी मदतीची ही रक्कम पदरी पडते काय, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सहा लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अतिवृष्टी व पुरामुळे पशिचम विदर्भातील सहा लाख शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु हा मुहूर्त टळला. आता किमान दिवाळीपूर्वी तरी मदतीची ही रक्कम पदरी पडते काय, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यात अमरावती विभागात चार लाख ७५ हजार ९९ हेक्टरमधील सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या प्रमुख पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले. सहा लाख आठ हजार ५३१ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. कृषी व महसूल विभागाने त्याचे पंचनामे केले. त्यावरून शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी ३४० कोटी २५ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेची मागणी करण्यात आली आहे. या नुकसानीचा अहवाल अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांनी २० सप्टेंबरला शासनाला सादर केला. त्यानंतर दोनच दिवसात अर्थात दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, अशी घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात आजतागायत ही रक्कम जमा झाली नाही. किमान आता दिवाळीपूर्वी तरी ही रक्कम मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शासनाने मदतीची घोषणा केली. परंतु अद्याप त्या संबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आलेला नाही.
सोलापूर, उस्मानाबादमुळे जीआर रखडला
ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे वेगळे सर्वेक्षण केले जात आहे. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीचे अहवाल शासनाला अद्याप प्राप्त न झाल्याने मदत वाटपासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात अडचण निर्माण झाल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले्ल्या जिरायती शेतीला हेक्टरी सहा हजार ८०० रुपये, बागायती शेतीला १३ हजार ५०० रुपये तर फळबागांना हेक्टरी १८ हजारांची मदत दिली जाते.
एकाच दिवशी ६५ मिमी पावसाच्या निकषाचा फटका
शासकीय यंत्रणेने केलेल्या पंचनाम्यात अवघ्या ३४० कोटींचे नुकसान दाखविले गेले असले तरी प्रत्यक्षात हे नुकसान किती तरी अधिक आहे. अतिवृष्टीत या नुकसानीसाठी एकाच दिवशी ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस हा निकष लावला जातो. परंतु प्रत्यक्षात ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस होऊनही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या निकषामुळे शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या ठिकाणांचे पंचनामेही करण्याची मागणी होत आहे.
जून ते सप्टेंबर या काळात पूर, पाऊस व अतिवृष्टीमुळे कितीही नुकसान झाले तरी शेतकऱ्याला एकच वेळा नुकसान भरपाई दिली जाते. गाव आणि शेतकरी बदलला तरच नवे नावे यादीत समाविष्ट केले जाते. शासनाकडून लवकरच मदत वाटपाचा आदेश जारी होण्याची प्रतीक्षा आहे.
- सुभाष नागरे, विभागीय सहसंचालक (कृषी), अमरावती