बहिणींनी सोडला हक्क ; लाडकी बहीण योजनेला लावली निकषाची चाळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:54 IST2025-01-25T17:53:00+5:302025-01-25T17:54:01+5:30

कागदपत्रांच्या पडताळणीची धास्ती : आता ऑफलाइन केले जाताहेत अर्ज

Sisters gave up their rights; Ladki Bhahin Yojana subjected to scrutiny of criteria | बहिणींनी सोडला हक्क ; लाडकी बहीण योजनेला लावली निकषाची चाळणी

Sisters gave up their rights; Ladki Bhahin Yojana subjected to scrutiny of criteria

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपयांचा लाभ मिळविण्यासाठी अक्षरशः अर्जाचा पाऊस पडला. अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सहा हप्त्यांचा लाभही मिळाला. मात्र, आता सरसकट लाभ देण्यात येणार नसल्याने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. अपात्र ठरल्यास कारवाईसह रक्कम वसुलीची धास्ती बहिणींना सतावत आहे. यामुळे बहिणी योजनेतून आपला हक्क सोडत आहेत. जिल्ह्यात आठवडाभरात १२ बहिणींनी हक्क सोडला आहे. हा आकडा वाढत जाणार आहे.


विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. यात सुरुवातीला जटील अटी असल्याने टिकास्त्र सोडण्यात आले. त्यानंतर अटी शिथिल करण्यात आल्याने घराघरांतून अर्ज करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आली. दीड हजार रुपये प्रतिमाह मिळण्यासाठी महिला वर्गामध्ये जणूकाही स्पर्धाच लागली होती. 


जिल्ह्यात सात लाखांवर बहिणी लाभार्थी 

  • जिल्ह्यात सात लाख १९ हजार ८७३ लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अर्ज केले होते. अर्जाची छाननी करण्यात आल्यानंतर सात लाख १२ हजार ४०२ बहिणी पात्र ठरल्या होत्या. यात सात हजार ४७१ अर्ज अपात्र ठरले. 
  • निवडणूक प्रचारात दीड हजाराच्या रकमेत वाढ करून २१०० रुपयांची घोषणा करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून बहिणी महायुतीच्या बाजूने उभ्या राहिल्या. हे मतमोजणीतून दिसले. आपल्या भावांना पुन्हा सत्तास्थापनेची संधी दिली.


बहिणीच्या खात्यातून तूर्तास रक्कम वसूल नाही 

  • लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी सरसकट महिलांनी अर्ज केले होते. आता लाभ कागदपत्रांची पडताळणी करून देण्यात येणार आहे. आधी घेतलेल्या सहा महिन्यांच्या हप्त्याच्या रकमेची वसुली तर होणार नाही ना, अशी भीती श्रीमंत बहिणींना सतावत आहे. 
  • तूर्तास रक्कम वसूल करण्याबाबत कोणतेही निर्देश नसल्याचे महिला व बालविकास विभागाने सांगितले. महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठीच्या योजनेत श्रीमंत बहिणींचाही भरणा मोठ्या प्रमाणात आहे. पती नोकरीवर असताना महिला लाडक्या बहिणी झाल्या.


जिल्ह्यात आकडा वाढणार 
कागदपत्रांची पडताळणी ऐकूनच १२ बहिणींनी लाभ नको म्हणत हक्क सोडला. लाभ नको असणाऱ्या बहिणींना तालुकास्तरावर ऑफलाइन अर्ज करता येणार आहे. येत्या काही दिवसांत हक्क सोडणाऱ्या बहिणींचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. आयकर भरणाऱ्या, चारचाकी वाहने असणाऱ्याही लाभार्थी ठरल्या. मात्र, आता कागदपत्रांची पडताळणी करून गरजूच लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. पडताळणीच्या धास्तीने बहिणींनी आम्हाला लाभ नकोय, असे अर्ज ऑफलाइन पद्धतीने महिला व बालविकास विभागाला दिले.


२,१०० रुपये कधी येणार? 
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना चांगलीच गाजली. महिलांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी २,१०० रुपयांची घोषणा करण्यात आली. त्याचा फायदाही तसाच झाला. निवडणुकीनंतर दीड हजाराचा सहावा हप्ता जमा झाला. आता बहिणीकडून २१०० रुपये कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Sisters gave up their rights; Ladki Bhahin Yojana subjected to scrutiny of criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.