मूक वेदना बोलकी झाली

By Admin | Updated: December 22, 2014 22:54 IST2014-12-22T22:54:38+5:302014-12-22T22:54:38+5:30

सर्व प्राणीमात्रांसाठी जोडीदार असणे हा निसर्ग नियम आहे. जीवनाची यथार्थता सहचरांशिवाय अपूर्ण भासते. प्रत्येकाचे एक मर्यादित का असेना भावविश्व असते. रंगीबेरंगी स्वप्नांची सप्तपदी मनात

Silent pain was spoken | मूक वेदना बोलकी झाली

मूक वेदना बोलकी झाली

परिचय : अंध, अपंग, मूक, बधिरांचा उपवर-वधू मेळावा
काशीनाथ लाहोरे - यवतमाळ
सर्व प्राणीमात्रांसाठी जोडीदार असणे हा निसर्ग नियम आहे. जीवनाची यथार्थता सहचरांशिवाय अपूर्ण भासते. प्रत्येकाचे एक मर्यादित का असेना भावविश्व असते. रंगीबेरंगी स्वप्नांची सप्तपदी मनात रुंजी घालत असते. आपण कुणाचेतरी हक्काचे आहोत. आपले कुणीतरी मायेचे आहेत. आयुष्यभर एकमेकांना सांभाळून साथ करावी आणि आपला वारसदारही निर्माण करावा. आम्ही असे असलो तरी आमची पिढी अशी असणार नाही या दुर्दम्य आकांक्षेपोटी लग्न करण्याची मानवी इच्छा सहजसुलभ स्वीकारही पाहिजे. हे खरे असले तरी प्रत्येकाची सहजीवनाची मनिषा पूर्ण होतेच असे नाही. त्यातही शारीरिक व्यंग असेल तर ही समस्या अधिक तीव्र होते. त्यांची मूक वेदना ठसठसीतपणे अंगप्रत्यंगातून बोलू लागले. आपल्या भावभावना व्यक्त करताना त्यांना प्रचंड ओढाताण करावी लागते. कधी त्यांना नीट चालता येत नाही. पाहता येत नाही. बोलता येत नाही तर कधी बोललेले ऐकायला येत नाही. आपली शारीरिक असहायता मान्य करून प्रत्येकजण व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. कधी मदतीला कोणी असतो तर कधी आप्तनातलगांनी झिडकारलेले असते. शेवटी एकला चलो रे या जगराहाटीला अनुसरुन ही निसर्गानी घडविलेली खास निर्मिती जोडीदाराचा शोध घेण्यासाठी एकत्र आली होती. आपणही सामान्यांसारखे उत्तम जीवन जगण्याचा ध्यास घेऊन एकत्र आली होती.
निमित्त होते सर्वधर्मीय अंध, अपंग, मूकबधीर अनाथ मुलामुलींचा वधू-वर परिचय मेळावा. स्थळ होते पाटबंधारे सांस्कृतिक भवन. गुरुदेव सार्वजनिक वाचनालय वडगाव रोड यवतमाळतर्फे हा आगळावेगळा उपक्रम यावर्षी राबविण्यात आला. १० वर्षांपासून विधवा-विधूर, परित्यक्ता, पौढ कुमारिका यांच्या परिचय मेळाव्यानंतर शारीरिक अपंगांसाठीही असा मेळावा घ्यावा असे वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद अजमिरे, सचिव नरेश उन्हाळे गुरुजी, सविता जुमळे, विजय साबापुरे, वंदना गुप्ता, वामनराव गोरे, प्रफुल्ल मेश्राम यांना प्रकर्षाने जाणवले. विचार कृतीत आणणारी ही माणसे त्या दृष्टीने कामाला लागली, आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद त्यांना लाभला. तब्बल २० मुले आणि १० मुलींनी आपल्या शारीरिक उणीवांसह आपला परिचय दिला. परिचयानंतर लग्न जळविण्यासाठी काही पालक आपसात चर्चा करताना दिसत होते, ही फलश्रृती होती.
‘छन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव
खाई दैवाचे तडाखे, त्याचे माणूस हे नाव
‘देवकीनंदन गोपाला’ या चित्रपटातील गीताप्रमाणे अनेक सामाजिक प्रहार सहन करीत निसर्गाशी दोन हात करणारे हे शूर जीव आहेत. त्यांच्या इच्छा फलद्रूप व्हाव्यात हीच अपेक्षा.

Web Title: Silent pain was spoken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.