सॅल्यूट मारून बहुरुपी हसवितो टीचभर पोटासाठी
By Admin | Updated: October 25, 2014 22:49 IST2014-10-25T22:49:09+5:302014-10-25T22:49:09+5:30
‘अहो दुकानदार तुम्ही गुळात साखर मिसळता... तेलात पाणी मिसळता... हॉटेलवाले तुम्ही बिना साखरेचा चहा बनविता... बिनपगारी फुल अधिकारी, लोकांच्या दारी झाला दंगा, चाललो घरी, असे विनोदीस्वर कानावर पडले की

सॅल्यूट मारून बहुरुपी हसवितो टीचभर पोटासाठी
प्रकाश लामणे - पुसद
‘अहो दुकानदार तुम्ही गुळात साखर मिसळता... तेलात पाणी मिसळता... हॉटेलवाले तुम्ही बिना साखरेचा चहा बनविता... बिनपगारी फुल अधिकारी, लोकांच्या दारी झाला दंगा, चाललो घरी, असे विनोदीस्वर कानावर पडले की, लक्षात येते कुणीतरी बहुरुपी आला. सॅल्यूट मारून लोकांना टीचभर पोटासाठी हसविण्याचा त्यांचा धंदा मात्र अलीकडच्या काळात चेहऱ्यावर हास्य असले तरी विवंचना असते ती टीचभर पोटाची.
महाराष्ट्र हा लोककलावंतांचा प्रदेश आहे. येथे शेकडो वर्षांपासून विविध लोककला जोपासल्या जात आहे. परंतु आता अलीकडच्या काळात बोटावर मोजण्याइतकीच माणसे कला जोपासत आहे. त्यापैकीच एक म्हणजे बहुरुपी होय. अनेकदा बहुरुपी इतके हुबेहूब रुप धारण करतो की, पाहणाराही थक्क होऊन जातो. पोलिसांचा पेहराव करून आलेला बहुरुपी जेव्हा अचानक पुढे येऊन सॅल्यूट ठोकतो तेव्हा अनेक जण त्याच्या कलेवर फिदा होतात. खिशात हात घालून त्याला बिदागी देतात. घरोघरी, गावोगावी जाऊन हा बहुरुपी शिट्टी वाजवून रुप दाखवितो. बहुरुपी मनोरंजन करतो, तेव्हा सामान्य माणूसही खदखदून असतो. त्याला रुपया, दोन रुपये देतो.
कलेच्या जोरावर लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या बहुरुपी समाजाचे मात्र अनंत प्रश्न आहे. उदरनिर्वाहचे कोणतेही साधन नसल्याने आपल्या कलेवरच त्याला गुजरान करावे लागते.
या गावावरून त्या गावाला जावे लागते. लोकांना हसविताना उरात मात्र दु:ख असते. लोकांना पोटभर हसवून आपले टीचभर पोट कसे भरता येईल याचाच विचार बहुरुप्यांना सतावत असल्याचे सावंगा येथील रणजित प्रल्हाद साखरे या बहुरुप्याने सांगितले. सातवीपर्यंत शिक्षण घेऊन गेल्या १५ वर्षांपासून तो बहुरुपी कला जोपासत आहे. शिक्षणाची इच्छा असतानाही केवळ गरिबीमुळे आपल्याला सोंग घ्यावे लागल्याचे सांगतो.