यवतमाळच्या श्याम राठोडने घेतली जागतिक झेप, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळावला पुरस्कार
By सुरेंद्र राऊत | Updated: December 26, 2025 18:54 IST2025-12-26T18:53:37+5:302025-12-26T18:54:01+5:30
मायक्रो फोटोग्राफीच्या दुनियेत चमकला श्याम

यवतमाळच्या श्याम राठोडने घेतली जागतिक झेप, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळावला पुरस्कार
सुरेंद्र राऊत, यवतमाळ: छंदाला सर्वस्व मानून जगणारी माणसे छोट्याशा गावातून मोठ्या कॅनव्हासपर्यंत पोहोचतात आणि तो अख्खा कॅनव्हासच व्यापून टाकतात. यवतमाळ येथील श्याम उल्हास राठोड या तरुणाने असाच कलेचा प्रवास करत आंतरराष्ट्रीय स्तरावर मायक्रो फोटोग्राफीच्या (सूक्ष्म छायाचित्रण) क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांचा प्रवास अन्य तरुणांसाठी प्रेरक ठरत आहे.
व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले श्याम राठोड (रा. कारेगाव यावली, ह.मु. काेल्हे-ले-आऊट यवतमाळ) यांनी आपल्या छंदाला ‘क्रिस्टल आर्ट मायक्रो फोटोग्राफी’ या दुर्मिळ कला प्रकारात रूपांतरित करून विज्ञान आणि कलेचा अनोखा संगम साधला आहे. यवतमाळसारख्या भागात अत्याधुनिक मायक्रोस्कोप, ध्रुवीकृत फिल्टर्स आणि रसायने मिळवणे मोठे आव्हान होते. मात्र संसाधनांच्या कमतरतेवर मात करत त्याने स्वतःच उपाय शोधले. मायक्रो फोटोग्राफीसाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी आपला अँस्ट्रोफोटोग्राफी सेटअप विकला.
जुने लेन्स परदेशातून मागवले, कॅमेरा मायक्रोस्कोपला जोडण्यासाठी थ्री डी प्रिंटेड कपलर तयार केला. तर पोलरायझेशनसाठी सामान्य कॅमेरा फिल्टर्स आणि सेलफेन प्लास्टिकचा रिटार्डर म्हणून वापर केला. त्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल घेण्यात आली आहे. २०२२ मध्ये त्यांना ‘एव्हीडेंट इमेज ऑफ दी इयर अवॉर्ड’, त्यानंतर २०२३ मध्ये ‘रॉयल सोसायटी पब्लीशिंग फोटोग्राफी कॉम्पीटिशन’मध्ये ते उपविजेते ठरले. २०२४ मध्ये त्यांना ‘मोनोव्हीजन अवॉर्ड’ आणि ‘इंडियन सायन्स फेस्टीवल’मधील ‘सायन्स इन फोकस’ पुरस्कार त्यांनी पटकावला. ‘अग्नी’ नावाच्या त्यांच्या छायाचित्राने शुद्धता, प्रकाश आणि आशेचे प्रतीक म्हणून विशेष ओळख मिळवली आहे.
तरुणांसाठी प्रेरक प्रवास
वीज कंपनीत उपकार्यकारी अभियंता म्हणून काम करत, केवळ छंदाच्या जोरावर जागतिक व्यासपीठावर पोहोचलेला हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दृढ इच्छाशक्ती आणि शिकण्याची ओढ असेल, तर लहान शहरातूनही जगाला ‘मायक्रो वर्ल्ड’चे सौंदर्य दाखवता येते, हे श्याम राठोड यांनी सिद्ध करून दाखवले आहे.