लेटलतिफांना कारणे दाखवा
By Admin | Updated: June 30, 2014 00:09 IST2014-06-30T00:09:07+5:302014-06-30T00:09:07+5:30
नवीन सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळेत उशिरा पोहोचणाऱ्या शिक्षकांना पंचायत समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दिवशी सकाळी ७ वाजता उपस्थित राहून विविध उपक्रम

लेटलतिफांना कारणे दाखवा
कळंब : नवीन सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळेत उशिरा पोहोचणाऱ्या शिक्षकांना पंचायत समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दिवशी सकाळी ७ वाजता उपस्थित राहून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देण्यात आले होते. असे असतानाही शहरातील बहुतेक शाळांतील शिक्षकांनी लेटलतिफचा परिचय दिला.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक आणि स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्याचे आदेश होते. शालेय पूर्वतयारी आणि शाळा शुभारंभाच्या दिनी शैक्षणिक सत्र २०१४-१५ मध्ये राबवावयाच्या विशेष शैक्षणिक उपक्रमाची माहिती मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली होती. त्याअनुषंगाने शालेय परिसर स्वच्छता, नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत, गावातून प्रभातफेरी, वर्गखोल्या शुशोभित करणे, शालेय परिसरात आंब्याच्या पानाचे तोरण, पताका, रांगोळी टाकून स्वागत करणे, पोषण आहारात गोड पदार्थ आदी बाबी काटेकोरपणे पाळण्याचे आदेश होते.
शहरातील अनेक शाळांतील शिक्षक ९ वाजतापर्यंत शाळेत पोहोचले नव्हते. शिक्षण विभागाच्या आदेशाला एकप्रकारे केराची टोपली दाखविण्याचे काम गुरुजींनी केल्याचे दिसून येते. अशा सर्व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषद बेसिक शाळेतील शिक्षक संजय राऊत, सचिन गायकवाड, वसंता वाघ हे उशिराने शाळेत पोहचले. संजय राऊत हे २५ जून रोजी शाळेत गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. शहराच्या मध्यभागी असलेली कन्या शाळा ८ वाजतापर्यंत उघडण्यातच आली नव्हती. या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता मसराम, शीला पवार, खडसे, उर्मीला, पटेल, सुष्मा बोरकर, गीता उमराणे, अमर थाटे, मंगेश डाफ हे नियोजित वेळेत गैरहजर आढळून आले. नेहरूनगर शाळेतील शिक्षक मीना चौधरी, विद्या ढोके, सत्यवती महल्ले व रजनी पांडव यांनीही शाळेच्या पहिल्या दिवशी लेटलतीफचा परिचय दिला. या सर्व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पंचायत समितीतून देण्यात आली.
कामात हयगय सहन करणार नाही - बीईओ
अनेक शिक्षक प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतात. काही शिक्षक कामात हयगय करत असल्याच्या तक्रारी आहे. अशा शिक्षकांवर बारीक नजर असून त्यांची नियमबाह्य कृती यापुढे सहन केली जाणार नाही, असे गटशिक्षणाधिकारी गणेश गायनर यांनी सांगितले.
शालेय वेळेत शिक्षकांच्या गप्पा
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या कन्या शाळेत २७ जून रोजी दुपारी ४ वाजता सर्व शिक्षक शाळेच्या बाहेर गोल खुर्च्या टाकून गप्पा मारत बसलेले होते. काही विद्यार्थी वर्गात तर काही बाहेर धिंगाणा घालत होते. याची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी गणेश गायनर यांनी या शिक्षकांची चांगलीच झाडाझडती घेतली. (तालुका प्रतिनिधी)