पुसद शहरात मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:46+5:30
शहरात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी साधा रुमाल बांधला तरी चालेल, विनाकारण पैसे खर्च करु नयेत असेही जाणकार सांगत आहेत. जे डॉक्टर संशयित रुग्णांवर उपचार करतात, केवळ त्यांच्यासाठीच ‘एन-९५’ मास्कची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता प्रत्येक दोन ते तीन तासांनी साबणाने स्वच्छ हात धुवावे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुसद शहरात मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा
प्रकाश लामणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : जिल्ह्यासह राज्यातील कारोना (कोव्हीड-१९) रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवडाभरात नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क आणि सॅनीटायझर खरेदी केल्याने सध्या शहरात मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे.
शहरात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी साधा रुमाल बांधला तरी चालेल, विनाकारण पैसे खर्च करु नयेत असेही जाणकार सांगत आहेत. जे डॉक्टर संशयित रुग्णांवर उपचार करतात, केवळ त्यांच्यासाठीच ‘एन-९५’ मास्कची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता प्रत्येक दोन ते तीन तासांनी साबणाने स्वच्छ हात धुवावे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना (कोव्हीड-१९) विषाणूचा प्रसार थांबविण्याकरिता व त्याच्यापासून प्रतिबंध व्हावा म्हणूनर् सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर मास्क व हॅन्ड सॅनिटायझर खरेदी करीत आहेत.
अनेकांनी भविष्यात तुडवडा जाणवेल, या भीतीने आधीच मास्क व सॅनिटायझरची खरेदी करुन ठेवली आहे. या स्थितीचा लाभ घेत काही धूर्त व्यक्ती साठेबाजी करुन मास्कचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन जादा दराने मास्कची विक्री करीत असल्याची चर्चा आहे.
नागरिकांनी रुमाल बांधावा
शहरात ठोक व किरकोळ विक्रेत्यांकडे मास्क व सॅनीटायझरचा तुटवडा आहे. मात्र मास्क, सॅनिटायझर मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. औषधी दुकानात मोठी गर्दी आहे. तथापि ग्राहकांची मागणी पूर्ण करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता गर्दीत जाणे टाळावे व साधा रुमाल बांधावा, असे आवाहन औषधी विक्रेते संतोष तडकसे यांनी केले आहे.
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या घटली. मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा आहे. शासनाकडे मागणी केली. अद्याप पुरवठा झाला नाही. नागरिकांनी साधा रुमाल बांधला तरी चालेल. साबणाने दोन-तिनदा स्वच्छ हात धुतल्यास कोरोनाचा धोका टाळता येईल. उपजिल्हा रुग्णालयात चार बेडचा विलगीकरण कक्ष स्थापन केला असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
डॉ. हरिभाऊ फुपाटे,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पुसद.