उमरखेडच्या एफएम केंद्रासाठी शोले स्टाईल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST2021-09-01T05:00:00+5:302021-09-01T05:00:16+5:30

केंद्र शासनाने येथील दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र ३१ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदिवासी बहुल व मागास असलेल्या उमरखेड तालुक्यातील जनतेत रोष निर्माण झाला आहे. दूरदर्शन केंद्रामुळे या भागातील नागरिकांना मनोरंजन, कृषी विषयक बातम्या तसेच कोरोनाबाबत मार्गदर्शक माहिती मिळत आहे. या माहितीपासून आता त्यांना वंचित रहावे लागणार आहे. सन २०१५ मध्ये येथे एफएम केंद्र मंजूर करण्यात आले होते. मात्र हे केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही.

Sholay style agitation for Umarkhed's FM station | उमरखेडच्या एफएम केंद्रासाठी शोले स्टाईल आंदोलन

उमरखेडच्या एफएम केंद्रासाठी शोले स्टाईल आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : येथील दूरदर्शन केंद्र ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून दूरदर्शन केंद्र बंद करण्यापूर्वी येथे मंजूर झालेले एफएम केंद्र सुरू करावे अशी मागणी पुढे आली आहे. मंगळवारी याच मागणीसाठी युवकांनी दूरदर्शन केंद्राच्या टाॅवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
एफएम केंद्र सुरू करण्याचे लेखी आश्वासन जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी टाॅवरच्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता.
केंद्र शासनाने येथील दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र ३१ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदिवासी बहुल व मागास असलेल्या उमरखेड तालुक्यातील जनतेत रोष निर्माण झाला आहे. दूरदर्शन केंद्रामुळे या भागातील नागरिकांना मनोरंजन, कृषी विषयक बातम्या तसेच कोरोनाबाबत मार्गदर्शक माहिती मिळत आहे. या माहितीपासून आता त्यांना वंचित रहावे लागणार आहे. 
सन २०१५ मध्ये येथे एफएम केंद्र मंजूर करण्यात आले होते. मात्र हे केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे येथील दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र बंद करण्यापूर्वी एफएम केंद्र सुरू करावे, ही मागणी तीव्र झाली आहे. त्यासाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सय्यद माजीद, प्रवीण इंगोले, अविनाश दुधे यांनी टाॅवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. शहराध्यक्ष राहुल मोहितवार, अंकुश पानपट्टे, गोपाल झाडे व अन्य कार्यकर्ते दूरदर्शन केंद्रावर ठाण मांडून बसले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोसळणाऱ्या पावसात आंदोलन सुरू असल्याने या आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण शहरवासीयांसह प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.  आकाशवाणी केंद्राच्या मागणीचे पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

Web Title: Sholay style agitation for Umarkhed's FM station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.