धक्कादायक! पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:55 PM2020-05-21T20:55:36+5:302020-05-21T20:56:42+5:30

शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली.

Shocking! Suicide of a young farmer by writing a letter to the Prime Minister, Chief Minister | धक्कादायक! पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

धक्कादायक! पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देशेजाऱ्याच्या शेतातच लावला गळफासशेताच्या रस्त्याचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ : शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली. गुरुवारी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली व सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले.
ज्ञानेश्वर भगवानराव कदम (२८) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली. त्यात आपल्या आजोबाने १९५२ मध्ये दोन हेक्टर शेती खरेदी केल्याचा उल्लेख आहे. या शेतात ये-जा करण्याकरिता रस्ता होता. मात्र कालांतराने शेजारील शेतकऱ्यांनी हा रस्ता वापरण्यास मनाई केली. शेजारील शेतकरी वारंवार त्रास देत होते. माझ्या घरातील महिलांना शिवीगाळ करीत होते. एकदा तर धारदार शस्त्राने शेजारील शेतकरी आपल्या वडिलांच्या अंगावर धावून आल्याचा उल्लेखही ज्ञानेश्वरने चिठ्ठीत केला आहे. शेतात जाण्यासाठी वारंवार रस्ता मागूनही उपयोग झाला नाही. हे प्रकरण लालफितशाहीत अडकले. त्यामुळे आपल्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख ज्ञानेश्वरने चिठ्ठीत केला आहे.
आपल्या मरणाची बातमी प्रसार माध्यमांनी प्रकाशित करून किमान मरणानंतर तरी आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही ज्ञानेश्वरने चिठ्ठीत व्यक्त केली. तसेच कुटुंबातील सर्वांची माफी मागून मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. दरम्यान, आत्महत्येनंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी प्रथम नकार दिला होता. मात्र त्यानंतर समजूत काढली गेल्याने त्यांनी गुरुवारी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी कदम यांच्या कुटुंबातील कुणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.

ज्ञानेश्वर कदम यांच्याजवळ पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी आढळली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
- एम. एम. बोडखे
ठाणेदार, उमरखेड

Web Title: Shocking! Suicide of a young farmer by writing a letter to the Prime Minister, Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.