सिंचन विहिरींना वितरणचा शॉक
By Admin | Updated: December 21, 2014 23:05 IST2014-12-21T23:05:54+5:302014-12-21T23:05:54+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पॅकेजमधून १४ हजार ८४५ विहिरी मंजूर झाल्या. त्यापैकी सात हजार विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

सिंचन विहिरींना वितरणचा शॉक
जोडणीची प्रतीक्षा : ओलिताचे स्वप्न अपूर्ण
यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पॅकेजमधून १४ हजार ८४५ विहिरी मंजूर झाल्या. त्यापैकी सात हजार विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाने शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न अपूर्ण आहे. वीज जोडणीचे शेकडो अर्ज प्रलंबित असून शेतकरी तुडुंब भरलेल्या विहिरीकडे डबडबल्या डोळ्यांनी पाहत आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री पॅकेजमधून विहिरी देण्यात आल्या. प्रत्येक तालुक्याला एक हजार या प्रमाणे १६ तालुक्याला १६ हजार विहिरी देण्याचे ठरविण्यात आले. त्यातील १४ हजार ८४५ विहिरी या योजनेअंतर्गत पात्र ठरल्या. त्यातील सात हजार विहिरींचे बांधकाम शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. विहिरी पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना आता सिंचनाची आस लागली आहे. विहिरीवरून ओलित करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल असे स्वप्न शेतकरी पाहत आहे. मात्र या स्वप्नाला वीज वितरण कंपनीने शॉक दिला आहे. विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने वीज जोडणीचे शेकडो अर्ज प्रलंबित आहे.
कृषी फिडरवर वीज जोडणीसाठी अतिरिक्त डीपी बसविणे गरजेचे आहे. मात्र ही डीपी बसविण्यासाठी लागणारा निधीच वीज वितरण कंपनीकडे नसल्याचे सांगितले जाते. आधीच अनेक रोहित्र गत काही महिन्यात जळाले आहे. त्या ठिकाणीही नवीन रोहित्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे वीज पुरवठ्याचा अतिरिक्त भार निर्माण होऊन शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. तासन्तास वीज पुरवठा खंडित असतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोटारपंप जळण्याचे प्रकार घडत आहे.
वीज पुरवठा झाला नसल्याने सात हजार शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न अपूर्ण राहिले. तसेच रबी हंगामाचे क्षेत्रही निम्म्यावर आल्याचे दिसत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पॅकेज अंतर्गत विहिरी दिल्या. मात्र त्यासाठी लागणाऱ्या विजेचे नियोजनच करण्यात आले नाही. आज विहिरी तयार आहे. परंतु वीज नाही. परिणामी शेतकऱ्यांना ओलिताला मुकावे लागत आहे. मात्र या प्रश्नाकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. (शहर वार्ताहर)