शिवसेनेत डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:42 IST2017-09-06T23:42:21+5:302017-09-06T23:42:37+5:30

थेट ‘मातोश्री’पर्यंत गेलेला जिल्हा शिवसेनेतील वाद मिटविण्याचे आणि येथील प्रमुख दोन नेत्यांमध्ये असलेली गटबाजी मोडित काढण्याची जबाबदारी परिवहन मंत्री तथा शिवसेनेतील ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Shivsena's repairs | शिवसेनेत डागडुजी

शिवसेनेत डागडुजी

ठळक मुद्देदिवाकर रावतेंवर जबाबदारी : शुक्रवारी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : थेट ‘मातोश्री’पर्यंत गेलेला जिल्हा शिवसेनेतील वाद मिटविण्याचे आणि येथील प्रमुख दोन नेत्यांमध्ये असलेली गटबाजी मोडित काढण्याची जबाबदारी परिवहन मंत्री तथा शिवसेनेतील ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या गटबाजीवर डागडुजी करण्यासाठी ना. रावते शुक्रवारी यवतमाळात येत आहे.
आर्णी रोडवरील एका मंगल कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाºयांची ८ सप्टेंबरला सकाळी १० वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. सर्व प्रमुख पदाधिकाºयांशी चर्चा करून त्यांची मते ना. रावते जाणून घेणार आहेत. ना. रावते यांच्याकडे पूर्वी पश्चिम विदर्भाची जबाबदारी होती. आता त्यांना संपूर्ण विदर्भाचे संपर्क नेते बनविण्यात आले आहे. या नियुक्तीनंतर शुक्रवारी रावते पहिल्यांदाच यवतमाळात येत आहे. जिल्हा शिवसेनेतील गटबाजी मोडून काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
जिल्ह्यात महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावनाताई गवळी हे प्रमुख दोन नेते आहेत. गेली कित्येक वर्ष एकजुटीने राजकारण, समाजकारण करणाºया या नेत्यांमध्ये वाशिम व यवतमाळच्या जिल्हा प्रमुख पदावरून वितुष्ट आले. ना. राठोड यांनी विश्वासात न घेता परस्परच जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या केल्याचा खा. गवळी गटाचा आरोप आहे. भावनाताई गवळी यांनीसुद्धा या नियुक्त्यांवर स्थगनादेश मिळवून ‘मातोश्री’वर आपलेही वजन कायम असल्याचे या निमित्ताने दाखवून दिले. परंतु या स्थगनादेशाने जिल्हा शिवसेनेत व नेत्यांमध्ये उघडउघड दोन गट पडले आहे. गवळी गटानेही सर्व तालुका स्तरावर चाचपणी करून आपले संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला हा वाद मिटविण्यासाठी ना. रामदास कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या स्तरावर प्राथमिक चर्चा झाल्यानंतरही स्थगनादेश मात्र कायम आहे. शिवसेनेचे नेते व कार्यकर्त्यांमधील गैरसमज दूर करण्यात, गटबाजी संपविण्यात ना. रावते यांना कितपत यश येते याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे नेतृत्व पक्षात गटबाजी नसल्याचा दावा जाहीर कार्यक्रमांमधून करीत असले तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे. गटबाजीचे उघड उघड प्रदर्शन पहायला मिळत आहे.

Web Title: Shivsena's repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.