शिवसैनिक ‘मजीप्रा’वर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:17 PM2018-11-05T21:17:15+5:302018-11-05T21:17:32+5:30

यवतमाळ शहरात गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा ठप्प असल्याने ऐन दिवाळीतच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी सकाळीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देऊन अभियंत्यांना धारेवर धरले.

Shivsainik hit 'Majpra' | शिवसैनिक ‘मजीप्रा’वर धडकले

शिवसैनिक ‘मजीप्रा’वर धडकले

Next
ठळक मुद्देखासदारांचे नेतृत्त्व : १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, चार महिन्यांच्या बिलमाफीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहरात गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा ठप्प असल्याने ऐन दिवाळीतच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी सकाळीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देऊन अभियंत्यांना धारेवर धरले.
यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. रस्त्यांची ही कामे करताना ठिकठिकाणी पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडले आहे. अलिकडेच मार्इंदे चौक परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले होते. हिवाळ्यात रस्त्यावर जणू गंगा वाहू लागली होती. मुख्य वाहिनी फुटल्याने दोन आठवड्यांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन दिवाळीतच पाणी नसल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ होत आहे. पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे.
एकीकडे प्रशासन भूगर्भातील पाणीसाठा वाढल्याचे तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. मुबलक पाणी असेल तर दरदिवशी नळ का सोडले जात नाही, असा सवाल यवतमाळकर नागरिक विचारत आहे. दरम्यान सोमवारी सकाळीच खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जीवन प्राधिकरणावर धडक देऊन अभियंत्यांना जाब विचारला. चार महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याने या काळातील पाणीपुरवठ्याचे संपूर्ण देयक माफ करावे, अशी मागणी भावना गवळी यांनी केली. शहराला तातडीने व नियमित पाणीपुरवठा सुरू करा, शुद्ध पाणी द्या अशी मागणी करण्यात आली. त्यावर प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी तिसरा पंप सुरू करून आजपासूनच रोटेशननुसार शहराला पाणीपुरवठा सुरू करीत असल्याचे सांगितले. सार्वजनिक नळांमधून पिवळे पाणी येत असले तरी ते आरोग्यास धोकादायक नाही, तातडीने ते शुद्ध करणे शक्य नसल्याचे बेले यांनी स्पष्ट केले. भावना गवळीच्या आंदोलनानंतर दर्डानगर टाकीवरुन त्या भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, उप जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, दिगांबर मस्के, तालुका प्रमुख संजय रंगे, विनोद काकडे, वसंत जाधव, नीलेश मैत्रे, यवतमाळ पंचायत समिती उपसभापती गजानन पाटील, शहर प्रमुख पिंटू बांगर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठ्याअभावी त्रस्त असलेल्या महिलांचीही संख्या यावेळी अधिक होती.

Web Title: Shivsainik hit 'Majpra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.