शरद जोशींच्या सभेने बदलली रावेरीची ओळख
By Admin | Updated: December 13, 2015 02:37 IST2015-12-13T02:37:44+5:302015-12-13T02:37:44+5:30
राळेगाव तालुका शेतकरी संघटनेचं आंदोलन याची नाळ जुळली ती रावेरी येथील राष्ट्रीय अधिवेशनातून.

शरद जोशींच्या सभेने बदलली रावेरीची ओळख
के.एस. वर्मा राळेगाव
राळेगाव तालुका शेतकरी संघटनेचं आंदोलन याची नाळ जुळली ती रावेरी येथील राष्ट्रीय अधिवेशनातून. शरद जोशींनी अवघ्या १५०० लोकसंख्या असलेल्या गावात तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन घेतले. महिला आघाडीच्या या अधिवेशनात लाखांवर महिला, पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. राळेगाव तालुक्याच्या इतिहासात झालेले हे अधिवेशन नवी ओळख देणारे ठरले. या अधिवेशनात शरद जोशींनी शेतकऱ्यांना शेतीच्या चतु:सूत्रीची माहिती दिली. विधवा व परितक्त्या महिलांकरिता स्त्री आधार केंद्राच्या स्थापनेची घोषणा केली. घरच्या लक्ष्मीच्या नावाने शेतीचा थोडासा तरी तुकडा करावा, असे आवाहन शेतकऱ्यांना त्यांनी केले. शेतमालाला भाव वाढवून देण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर वर्धा रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलनही करण्यात आले. शेतकरी संघटनेचे बाळासाहेब देशमुख, नामदेवराव फटींग, मारोतराव काळे, डॉ. विनोद थोडगे, इंदरचंद बैद, सुरेश आगलावे या सक्रिय कार्यकर्त्यांशी त्यांचा नेहमीच संपर्क होता. शरद जोशींनी रावेरी येथील सीता मंदिराच्या विकासासाठी स्थानिक विकास निधीतून मोठा निधी दिला होता. यानंतर देशातील एकमेव सीता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. महिला आघाडीच्या राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती शेतकरी संघटक या मासिकातून देशपातळीवर पोहोचली. त्यासोबतच रावेरीचे सीता मंदिर आणि राळेगाव तालुकाही या अधिवेशनाने प्रकाशझोतात आले. शरद जोशी यांनी आपली स्वत:ची शेती विकून त्यातून मिळालेल्या पैशातून सीता मंदिराचा स्वखर्चाने जीर्णोद्धार केला. सीता मंदिरासोबतच शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची नाळ येथे गुंफली आहे. जेव्हा जेव्हा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा विषय चर्चिला जाईल तेव्हा रावेरी येथील महिला आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन निश्चितच दखलपात्र राहणार आहे.
शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थाने पोरका झाला आहे. रडत बसण्यापेक्षा आपल्या हक्काप्रती लढत राहण्याचे बळ शेतकऱ्यांना शरद जोशी यांनी दिले होते. त्यांच्याकडून आपल्याला अनेकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची प्रेरणा मिळत होती. शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि न्यायप्रती सतत जागरूक ठेवणारा शेतकरी नेता काळाच्या पडद्याआड गेला. ते उत्तम शेती अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या निधनाने समाजासोबतच शेतकऱ्यांचे, शेतकरी आंदोलनाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
- संजय राठोड, पालकमंत्री यवतमाळ
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्यापूर्वी अनेक शेतकरी आंदोलने झाली. महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ लिहून शेतकरी मुक्तीची मांडणी केली होती. मात्र फुले यांच्या तत्त्वज्ञानावर आधारीत आंदोलन झाले नाही. पूर्वी जी आंदोलने झाली, त्यामागे शेतकरी मुक्तीचे तत्त्वज्ञान नव्हते. शरद जोशी यांनी आंदोलनाला तात्वीक अधिष्ठान दिले. शेतकऱ्यांना आपल्या शोषणाची जाणिव आणि ज्ञान देणारे पहिले नेते म्हणजे शरद जोशी.
- सुधाकर जाधव
शेतकरी संघटनेचे प्रथम जिल्हा प्रमुख
आज सकाळी दूरचित्रवाहीनीवरील बातमी पाहिली आणि मी हळहळलो. तारुण्याचे दिवस शेतकऱ्यांसाठी घालविले. शेतकऱ्यांमध्ये जागृती आणण्याचे काम शरद जोशींनी केले. राज्यासोबत राज्याबाहेरही शरद जोशींच्या सोबत मी काम केले आहे. त्यांचे काम सर्वांनाच प्रेरणा देणारे होते. ही पोकळी भरुन निघणे अशक्य आहे.
- जगदीश दुबे
शेतकऱ्यांचे शोषण खऱ्या अर्थाने कोण करतो, हे सप्रमाण सिध्द करणारा शेतकरी नेता गमावला आहे. शेतमालाला जोपर्यंत रास्त भाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारणार नाही, हे पटवून देणारा नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या जाण्याने शेतकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली.
- भास्कर महाजन, कळंब
शेतकरी पोरका झाला आहे. जिल्ह्यात शरद जोशी यांचे अनेक आंदोलने झाली. रावेरीचे सीता मंदिर आंदोलन अनेकांच्या स्मरणात आहे. यासोबतच कापसाचे आंदोलनही प्रत्येक शेतकऱ्यांना आठवण करून देणारे आहे.
- विजय कदम, शेतकरी विकास परिषद
शेतकऱ्यांचा आधार निघून गेला. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण केली होती. यामुळे सरकार त्यांच्या आंदोलनाला घाबरत होते. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांकडे आपुलकीने पाहिले गेले. भविष्यात असा नेता होणे नाही.
- दशरथ बोबडे, यवतमाळ
शरद जोशींनी कामाला सुरुवात केली तेव्हा शेतकरी असंघटीत होते. त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. आजच्या घडीला त्यांच्यासारख्या संघटकाची खरी गरज आहे. मोठी नोकरी सोडून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. शेतकऱ्यांचे मर्म त्यांनी मांडले. त्यांच्या रूपाने विचार प्रेरित होऊन शेतकरी प्रश्नांसाठी लढले. आज त्यांच्या जाण्याने कुशल नेता गमावला आहे.
- साधना दुबे
शब्दात व्यक्त होत नाही इतके दु:ख शरद जोशी यांच्या निधनाने चळवळीच्या कार्यकर्त्यांना झाले आहे. स्वाभिमानाने जगण्याची शिकवण त्यांनी शेतकऱ्यांना दिली. शदर जोशींनी शेतकऱ्यांसोबतच महिलांनाही अधिकारी मिळवून दिला. ते अदभूत व्यक्तिमत्व होते. मुक्त व्यापार हवा या विचारासाठी त्यांनी लढा दिला. कापसाची एकाधिकारशाही बंद करण्याचे काम त्यांनी केले. यासारखी अनेक आंदोलने जिल्ह्यानेही त्या काळात पाहिले आहे.
- जयंत बापट
शेतकऱ्यांवर वाढलेले कर्ज ही त्यांची स्वत:ची चूक नसून शासनाच्या धोरणाची चूक आहे, याची जाणीव शरद जोशी यांनी करून दिली. त्यामुळे कर्ज असूनही शेतकरी आज ताठ मानेने जगत आहे. शेतकऱ्यांना स्वाभीमानाने जगणे त्यांनी शिकविले. शेतीसंबंधी संपूर्ण आर्थिक विचार मानणारा विचारवंत आणि लढवय्या शेतकरी नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रचंड नुकसान झाले.
- देवीदास काळे, कळंब
देशभरातील शेतकऱ्यांचे नुकसान शरद जोशींच्या जाण्याने झाले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतशिवारात तंत्रज्ञान आणण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण अशा ठाम विचाराने त्यांनी त्या काळात सरकारवर कठोर टीका केली. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- दीपक आनंदवार, यवतमाळ
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी शरद जोशींचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला होता. शेतकरी, महिला, दारुबंदी या विषयावर त्यांची अनेक आंदोलने झाली. एक धुरंधर नेता हरवला आहे. शेतकरी पोरका झाला.
- दत्ता चांदोरे, शेतकरी विकास परिषद
शेतकऱ्यांचे गहन प्रश्न आणि समस्या केंद्र आणि राज्य पातळीवर नेण्याचे श्रेय केवळ शरद जोशी यांनाच आहे. राज्यात त्यांनीच पहिली व प्रभावी शेतकरी चळवळ उभारली. शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न त्यांनीच खऱ्या अर्थाने मांडले. त्यांच्या निधनामुळे शेकऱ्यांच्या चळवळीची हानी झाली.
- अॅड. विनायक काकडे, वणी.
शरद जोशी यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा योद्धा हरपला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर काही केले. मात्र शेतकऱ्यांना त्याचा पूरेपूर लाभ घेतला आला नाही. सर्वच पक्ष शेतकऱ्यांचे शत्रू असल्यामुळे त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतकरी समर्थक मते पक्षाला मिळून शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची त्यांची स्पष्ट भूमिका होती.
- दशरथ धांडे
शेतकऱ्यांना आपल्या हक्काची खऱ्या अर्थाने जाणीव करून देणारा शेतकरी नेता म्हणून शरद जोशी यांचे नाव अग्रक्रमावर राहील. ‘भीक नको-हवे घामाचे दाम’ ही घोषणा देणाऱ्या जोशींनी सर्वप्रथम सर्व स्तरातील शेतकऱ्यांचे संघटन करून न्याय हक्काबाबत जागृती केली. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
- अरूण ठाकरे, बोथ (पांढरकवडा)
एक लढवय्या शेतकरी नेता, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निस्वार्थपणे सत्ताधाऱ्यांशी दोन हात करणारा नेता आणि सर्व जाती-धर्माच्या शेतकऱ्यांना एकत्र आणणारा नेता म्हणून शरद जोशी यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या निधनाने तमाम शेतकरी बांधवाची फार मोठी हानी झाली आहे.
- मोहन मामडीवार, पांढरकवडा
शरद जोशी यांच्या निधनाने शेतकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले. त्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला. शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण, हे शासनाला ठणकावून सांगणारे शरद जोशी हे शेतकऱ्यांचे एकमेव नेते होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारा हा नेता आपण गमावला आहे. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- रामकृष्ण पाटील, पांढरकवडा
अखेरच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी जगणारा नेता आपल्यातून गेला, ही तमाम शेतकऱ्यांसाठी दु:खदायक घटना आहे. उत्पादन खर्चानुसार शेतमालाला भाव देण्यात यावा, याबाबत अभ्यासपूर्ण विचार मांडणारे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जाण्याने फार मोठी हानी झाली आहे.
- भूपेंद्रसिंग कोंघारेकर, पांढरकवडा